म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबईच्या सागरी किनारपट्टीचे प्रदूषण कमी करून समुद्र स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी मुंबई महापालिका आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सागरी प्रदूषण नियंत्रणासाठी कार्यरत असलेल्या ‘द ओशन क्लीनअप’ या संस्थेदरम्यान बुधवारी सामंजस्य करार करण्यात आला. त्यानुसार, समुद्रात वाहून जाणारा प्लास्टिक तसेच अन्य घनकचरा रोखणे, त्याचे संकलन करणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सागरी प्रदूषणावर प्रभावी उपाययोजना राबविणे यावर भर दिला जाणार आहे.
मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांचे पर्यावरणीय संतुलन राखणे, सागरी जैवविविधतेचे संरक्षण करणे आणि स्वच्छ मुंबईच्या दिशेने ठोस पाऊल उचलणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी आणि मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. ‘द ओशन क्लीनअप’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बोयन स्लॅट यांनी करारावर स्वाक्षरी केली. यावेळी नेदरलँड्सचे महावाणिज्यदूत नबील तौवाती आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुंबईत या उपक्रमासाठी ‘प्लास्टिक फिशर’ आणि ‘युनायटेड वे मुंबई’ या स्थानिक अंमलबजावणी भागीदार संस्थांचे सहकार्य लाभले आहे.
‘द ओशन क्लीनअप’ ही संस्था महासागरांना प्लास्टिक प्रदूषणापासून मुक्त करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहे. या संस्थेने मालाड खाडीतील रामचंद्र नाला आणि ट्रॉम्बे खाडीतील सुभाषनगर नाला येथे ‘ट्रॅश इंटरसेप्टर’ प्रणाली यशस्वीपणे बसविली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून सप्टेंबर २०२६ अखेरपर्यंत एकूण ११९.५ मेट्रिक टन कचरा संकलित करून हटविण्यात आला आहे. त्यात ट्रॉम्बे खाडीतील १०२ मेट्रिक टन, तर मालाड खाडीतील १७.५ मेट्रिक टन कचऱ्याचा समावेश आहे.
मुंबईची किनारपट्टी, नद्या आणि सागरी क्षेत्र स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना सुरू आहेत. महापालिकेने स्वतः १४ महत्त्वाच्या ठिकाणी कचरा प्रतिबंधक अडथळे (ट्रॅश बूम्स) उभारले आहेत. दहिसर, पोईसर आणि ओशिवरा नद्यांचे पुनरुज्जीवन प्रकल्पही सुरू आहेत. लव्हग्रोव्ह आणि इर्ला येथे ‘बॅक रेक स्क्रीन’ बसविण्यात आल्या असून, ११ ठिकाणी ‘ट्रॅश नेट’ही बसविण्यात आले आहेत.
महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले की, मुंबईचा समुद्रकिनारा, नद्या आणि सागरी परिसंस्था स्वच्छ व सुरक्षित राखण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्न करत आहे. ‘द ओशन क्लीनअप’सोबत झालेल्या करारामुळे आणखी नऊ ठिकाणी ‘इंटरसेप्टर’ यंत्रणा बसविण्यात येणार असून, त्यामुळे समुद्रात जाणारा प्लास्टिक आणि इतर घनकचरा रोखण्यास मदत होईल.
येथेही 'इंटरसेप्टर' नव्या सामंजस्य करारांतर्गत प्लास्टिक कचरा रोखण्यासाठी 'इंटरसेप्टर' यंत्रणा आणखी नऊ ठिकाणी कार्यान्वित केली जाणार आहे. या नऊ ठिकाणांमध्ये दादर-धारावी नाला, पिरामल नाला, गजधरबंध नाला, मिठी नदी, ट्रॉम्बे खाडी, कलानगर नाला, राजेंद्रनगर नाला, माहुल नाला आणि मालवणी नाला यांचा समावेश आहे. या यंत्रणांमुळे समुद्रात प्रवेश करणारा प्लास्टिक आणि इतर तरंगता कचरा प्रभावीपणे रोखता येणार आहे.