-प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे
'ज्ञानेश्वरी’चा अभ्यास आपण सुरू करतो, तशी त्यातील रत्नं आपल्याला सापडू लागतात. ही रत्नं म्हणजे जीवन जगण्याची अनमोल सूत्रं आहेत. त्यामुळे या ग्रंथाची ओढ आपल्याला लागून राहते. आज पाहू या चौदाव्या अध्यायातील अशा सुरस ओव्या. यात श्रीकृष्ण अर्जुनाला समजावत आहेत ‘माया’ किंवा अज्ञानाचं स्वरूप. हे अज्ञान नाहीसं कसं होईल? तर माणसाला आत्मस्वरूप कळलं की. हा भाग कळायला काहीसा कठीण आणि अमूर्त. परंतु ज्ञानदेव त्याला असं काही रंगतदार रूप देतात, त्यामुळे तो सर्वांना सहजतेने कळतो. यासाठी त्यांनी योजलेल्या दाखल्यांनी आपण चकित होतो. त्यात अर्थघनता आहे, तसंच नावीन्य आणि विविधता आहे. याचा अनुभव देणार्या या ओव्या.
हा संवाद पुढीलप्रमाणे - ‘हे धनंजया, आपल्या स्वरूपाचा आपल्याला जो विसर पडतो, तेच या अज्ञानाचे रूप. आणखी असे आहे की, ज्याप्रमाणे हातात दिवा घेऊन अंधार शोधू लागले असता तो दिसत नाही, त्याप्रमाणे आत्मरूपाचा विचार केला की ते (अज्ञान) दिसेनासे होते.’ आत्मज्ञानाचा दिवा हातात असेल तर अज्ञान कुठून सापडणार? हा विचार इथे किती सुंदरतेने साकारला आहे! पुढचा दाखला थेट स्वयंपाकघरात घेऊन जातो.
‘हालविलिया जाय। निश्चळीं तरी होय।
दुधीं जैसी साय। दुधाची ते।’
ज्ञानियांच्या प्रतिभेला वंदन करावं, असा हा आगळा दाखला आहे. ‘दुधावरची साय’ हा दाखला योजून माया, वात्सल्य दाखवायचं ही झाली रूढ कविकल्पना. मात्र ज्ञानदेवांनी तो योजला कशासाठी? अज्ञानासाठी. ही त्यांची नवे नवे उन्मेष दाखविणारी प्रतिभा होय. इथे ‘हालविलिया’ या क्रियेतून कृती, श्रम सुचवले आहेत. दूध हलवत राहिले तर साय येत नाही. त्याप्रमाणे ज्ञान-प्रक्रिया मंथन चालू असेल तर अज्ञानरूपी साय जमा होणार नाही. मनाच्या शुद्ध स्वरूपासाठी दुधासारख्या पूर्णान्न, पवित्र पेयाचा दाखला किती समर्पक! हृदयात शिरायचा मार्ग पोटातून जातो, असं म्हणतात. ज्ञानदेव अशा अप्रतिम दृष्टान्त योजनेद्वारे श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतात. म्हणून ज्ञानदेवांचे शब्द घेऊन म्हणावंसं वाटतं -
‘या ज्ञानेश्वरीने मज लावियला वेऽऽऽधु...’
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.