-डॉ. रवींद्र उटगीकर
गुणवत्ता जगभरात आहे, परंतु त्या गुणवत्तेला संधी मात्र सर्वत्र समप्रमाणात नाहीत.- केनेडी ओडेडे
(केनियातील सामाजिक उद्योजक, लेखक)
आर्थिक सहकार्य आणि विकास परिषद (ओईसीडी) ही जगातील ३८ प्रगत देशांची संघटना आहे. या संघटनेतर्फे दर वर्षी आंतरराष्ट्रीय स्थलांतर अहवाल प्रसिद्ध केला जातो. यंदाचा अहवाल संघटनेने नुकताच सार्वजनिक केला. त्यानुसार, या देशांत स्थलांतर करणाऱ्या आणि तेथील नागरिकत्व स्वीकारणाऱ्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण भारतीयांचे आहे.
या स्थलांतराकडे या प्रगत देशांमधील सामाजिक-आर्थिक परिस्थिती आणि तेथील राज्यकर्त्यांनी घेतलेल्या भूमिका यांच्या चौकटींतूनही पाहणे महत्त्वाचे आहे. अनेक प्रगत देशांमध्ये स्थलांतरितांकडे ‘स्थानिकांच्या नोकऱ्यांवर गदा आणणारे’ म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. या देशांतील घरांची घटती उपलब्धता, सार्वजनिक सेवांवर वाढणारा ताण अशा काही स्वाभाविक प्रश्नांचीही भर पडत आहे. यामुळे हे देश आपापल्या गरजांनुसार स्थलांतरितांचा प्राधान्यक्रम काटेकोरपणाने ठरवत आहेत. दुसरीकडे, काही प्रगत देशांना स्थानिक लोकसंख्येच्या वाढत्या सरासरी वयोमानामुळे रोजगारक्षम मनुष्यबळाची टंचाई भासू लागली आहे. जपानसारख्या देशाने तर भारतासोबत यासंबंधीचा द्विपक्षीय कार्यक्रम आखून, पुढील पाच वर्षांत कुशल व अर्धकुशल अशा ५० हजार भारतीयांना आपल्या देशात रोजगार देण्याचे नियोजनच केले आहे.
या पार्श्वभूमीवर, २०२५मध्ये या देशांत ६१ लाख नागरिकांचे कायमस्वरूपी स्थलांतर झाले होते. आधीच्या वर्षाच्या तुलनेत ती किंचित घट असली, तरी करोनाकाळापेक्षा १२.५ टक्क्यांची वाढ होती. अर्थात, स्पेन, इटली व पोर्तुगाल या दक्षिण युरोपीय देशांमध्येच ही वाढ लक्षणीय आहे. कुटुंबातील व्यक्तींसोबत राहण्यासाठी त्यांच्यावरील अवलंबितांच्या स्थलांतराचे प्रमाण यामध्ये सर्वाधिक, ४५ टक्के, तर नोकरीच्या संधींनिमित्तचे स्थलांतर १३ टक्के राहिले. छळ, हिंसाचार आदी कारणांमुळे होणाऱ्या स्थलांतरांत मात्र २६ टक्के घट झाली, हे येथे उल्लेखनीय आहे.
भारत हा केवळ जगातील सर्वाधिक लोकसंख्येचाच देश नव्हे, तर सर्वाधिक तरुणांचा व चीनपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचा रोजगारक्षम मनुष्यबळाचाही देश आहे. त्यामुळे, प्रगत देशांतील नव्या स्थलांतरितांत २०२४मध्ये सर्वाधिक संख्या (४.९४ लाख) भारतीयांची होती. चिनी नागरिक (३.५१ लाख) दुसऱ्या क्रमांकावर होते. परंतु चिनी नागरिकांच्या स्थलांतरात २०२३नंतर सातत्याने घट होत आहे. देशांतर्गत आर्थिक संधींमध्ये झालेली वाढ हे त्याचे प्रमुख कारण मानले जाते.
अर्थात, निव्वळ आकडेवारीवर नजर टाकून यातील कल समजणार नाहीत. कारण, २०२३च्या तुलनेत २०२४मध्ये या देशांत होणारे भारतीयांचे स्थलांतर प्रत्यक्षात १९ टक्क्यांनी घटले होते! अमेरिका, कॅनडा, ब्रिटन व ऑस्ट्रेलिया या स्थलांतरितांचे प्राधान्य राहिलेल्या देशांत ही घट लक्षणीय होती. त्याआधीच्या पाच वर्षांत ९.२५ लाख भारतीयांनी या ३८ प्रगत देशांचे नागरिकत्व पत्करले होते. २०१५ ते २०१९ या पाच वर्षांच्या तुलनेत ही वाढ दीड पटीने होती. या संपूर्ण दशकात या देशांतील विद्यापीठांत शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या चौपट झाली होती. २०२४मध्ये या ३८ देशांत ८.२९ लाख भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत होते. केवळ चिनी विद्यार्थ्यांचीच संख्या (८.५० लाख) त्यापेक्षा अधिक आहे. माहिती तंत्रज्ञान व वैद्यकीय क्षेत्रांपलीकडील भारतीय तरुणांचा प्रगत देशांत रोजगारसंधींचा शोध हेदेखील या स्थलांतरात वाढ होण्याचे महत्त्वाचे कारण ठरत आहे. कारण आता ज्येष्ठ नागरिकांची शुश्रूषा, आरोग्यसेवा, अतिथ्य, कौशल्याधारित व्यवसाय अशा नव्या क्षेत्रांतही भारतीय तरुण रोजगारसंधींचा शोध घेत आहेत.
भारत हा जगातील सर्वाधिक आर्थिक विकासदर राखणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून गणला जातो. अलीकडील काही वर्षांत आपल्या अर्थव्यवस्थेने लक्षणीय प्रगती साधत जगात सहाव्या क्रमांकापर्यंत झेप घेतली आहे. तरीही, भारतीयांचा कल प्रगत देशांत स्थलांतर करण्याकडे का आहे, हा प्रश्न येथे उपस्थित होऊ शकतो. त्याची ठळक कारणे अशी :
अधिक कमाईचे प्रलोभन : भारतातील व प्रगत देशांतील उत्पन्नातील अंतर हे यामागील सर्वांत मोठे कारण आहे. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली असो, जर्मन इंजिनिअरिंग कंपन्या असोत की ब्रिटिश रुग्णालये , या सर्व ठिकाणचे पगार हे भारतात राहून संपत्ती निर्मितीच्या उपलब्ध होणाऱ्या संधींपेक्षा कितीतरी अधिक आहेत.
अत्युच्च दर्जाचे शिक्षण : प्रगत देशांतील उच्च शिक्षणाचा दर्जा, त्यातून जागतिक स्तरावर काम करण्याची निर्माण होणारी क्षमता, तेथील संशोधनाच्या सोयी आणि या शिक्षणातून पुढे रोजगारसंधी शोधण्याचे प्रस्थापित झालेले मार्ग हे भारतात राहून अशा संधींचा वेध घेण्यापेक्षा उजवे आणि सुकर आहेत.
जीवनस्तर : शिक्षण आणि रोजगार यांच्या जोडीला प्रलोभन ठरते ते प्रगत देशांतील सुखासीन जीवनशैलीचे. स्वच्छ हवा, कमी गजबज असणारे नागरी जीवन, भरवशाच्या सार्वजनिक सोयी, सामाजिक सुरक्षा आणि पुढील पिढीसाठी दर्जेदार शिक्षणाच्या संधी या बाबी कायमस्वरूपी स्थलांतर करण्याच्या पारड्यातील वजन वाढवतात.
प्रस्थापित समुदायाचे पाठबळ : प्रगत देशांकडे भारतीयांचे स्थलांतर दीर्घकाळ होत असल्याने हे समुदाय आता अनेक देशांत प्रस्थापित झाले आहेत. त्यामुळे नवागतांना त्यांचे नैतिक पाठबळ तर मिळतेच, खेरीज नोकरीतील शिफारशीपासून घर घेण्यासाठीच्या सल्ल्यापर्यंत विविध स्तरांवर स्थिरस्थावर होण्यासाठी थेट मदतही प्राप्त होते.
देशांतर्गत कोंडीतून मार्ग : भारतातील उच्च शिक्षण संस्थांतील प्रवेशापासून पांढरपेशा उच्चाधिकारी नोकऱ्यांपर्यंत अनेक स्तरांवरील स्पर्धा दिवसेंदिवस बिकट होत आहे. प्रगत देशांतील संधी या त्याला बगल देण्याचा मार्ग दाखवतात. शिवाय, अनेक उद्योजक व व्यावसायिक कर व नियमनाच्या जाचक तरतुदींवरील पर्याय म्हणूनही या देशांकडे वळतात.
या अहवालाचा एकूण सूर पाहता, स्थलांतरितांना आपली दारे खुली ठेवताना प्रगत देश काटेकोर निकषांच्या चाळण्या लावू लागले असले, तरी सरासरी वयोमान वाढतच चाललेल्या या देशांना अनेक कारणांसाठी स्थलांतरित तरुणांची गरजही आहे. ज्येष्ठत्वाकडे झुकणाऱ्या आपल्या लोकसंख्येच्या शुश्रूषेसाठी असो की आर्थिकदृष्ट्या प्रस्थापित केलेली आघाडी टिकवण्यासाठी असो; या देशांना तरुण मनुष्यबळ हवे आहे.
भारतासाठी हे स्थलांतर आपल्याकडील तरुण मनुष्यबळाच्या ‘संपत्ती’चे निदर्शक तर आहेच; त्याचबरोबर, या मनुष्यबळाच्या आकांक्षांची पूर्तता करण्याचे आव्हान किती मोठे आहे, याचा आरसाही पुढे ठेवणारे आहे. भारतीय तरुणांच्या गुणवत्तेला स्वतःच्या देशातही प्रगत देशांप्रमाणेच संधी मिळू लागली, तर या मनुष्यबळाची स्वप्नेही व्यापक प्रमाणात साकार होतील आणि इ. स. २०४७पर्यंत विकसित देश होण्याचे सर्व भारतीयांचे सामूहिक स्वप्नही प्रत्यक्षात येईल.
(लेखक व्यवस्थापनतज्ज्ञ असून, उद्योग क्षेत्रात गेली तीन दशके कार्यरत आहेत.)
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.