हवामानातील बदलांवर धोरणे आखून ती कृतीत उतरवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांतर्फे तुर्कीयेतील अंताल्या येथे भरलेल्या परिषदेतील (कॉप ३१) वाटाघाटी, पेट्रोल, डिझेल, तेल यांसारख्या जीवाश्म इंधनाच्या मुद्द्यावरून फिस्कटणे दुर्दैवी आहे. हवामानातील टोकाच्या बदलांमुळे नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाण्याची वेळ सातत्याने येत असूनही याबाबत जगभरातील धुरीण एकमेकांना दोषी ठरवण्याच्या पलीकडे जात नसल्याचे यातून पुन्हा दिसले. विशेषत: यंदा जगभरात अनेक ठिकाणी उच्चांकी तापमानाची नोंद होत असताना आणि आता ‘सुपर एल निनो’सारख्या स्थितीला सामोरे जात असताना परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, हवामानातील बदलाला कारणीभूत असलेल्या जीवाश्म इंधनाबाबत रास्त निर्णय घेण्यात ते कमी पडल्याचेही दिसले.
नैसर्गिक साधनसंपत्तीचा पुरेपूर वापर करून प्रगत झालेल्या अमेरिकेसारख्या देशाने याबाबतच्या ‘पॅरिस करारा’तून माघार घेऊन हवामान बदल रोखण्याचे उत्तरदायित्व तर नाकारले आहेच; परंतु जीवाश्म इंधनाचा वापर कायम ठेवून आपले वर्चस्व राखण्याचे धोरण स्वीकारले आहे. यंदा सलग दुसऱ्या वर्षी अमेरिकेने ‘कॉप’ परिषदेवर बहिष्कार घातला. युरोपीय समुदायातील देश; तसेच ब्रिटन हे अन्य प्रगत देश याबाबत सकारात्मक असून, तापमानवाढ रोखण्यासाठी कृतीही करीत आहेत. तुर्कीयेतील परिषदेअंती होणाऱ्या करारात जीवाश्म इंधनाचा थेट उल्लेख नसल्यावर प्रामुख्याने या देशांनी आक्षेप घेतला. त्यामुळेच वाटाघाटी फिस्कटल्या.
अंताल्या येथील परिषदेत, जीवाश्म इंधनाचा वापर कमी करून अन्य पर्यायी स्रोतांकडे वळण्यावर सव्वाशेहून अधिक देशांनी सहमती दर्शवली होती. त्यांनी तशी मागणीही केली होती. वाहनांसह अन्य बाबींसाठी विजेचा वापर वाढवून थेट प्रदूषण टाळण्याचा मुद्दा आता जोरकसपणे मांडला जातो. ई-वाहनांमध्ये चीनने आघाडी घेतली असून, भारतासह अनेक देश याबाबत सकारात्मक कृती करीत आहेत. वीजनिर्मितीसाठी जीवाश्म इंधनाचा वापर प्रामुख्याने होत असला, तरी अपारंपरिक ऊर्जोस्रोतांचा वापरही वाढत आहे. त्यासाठी प्रगत देशांनी विकसनशील देशांना सन २०३५पर्यंत तीनशे अब्ज डॉलर निधी देण्याचे मान्य केले आहे. मात्र, याबाबतची कटिबद्धता दर्शवली जात नाही. तसेच ही रक्कम अनुदानाच्या स्वरूपात असणार की कर्जाच्या याबद्दल स्पष्टताही नाही. या आधीच्या परिषदांतही याबद्दल एकमत झाले नाही.
यंदाही याबाबत सुस्पष्टता आली नाही. युरोपीय देश निधी देण्यास राजी असले, तरी थेट सरकारी तिजोरीतून मदत न देता खासगी गुंतवणुकीद्वारे ती देण्याची त्यांची भूमिका आहे. शिवाय आपल्याबरोबर अन्य श्रीमंत देशांनी आणि खासगी कंपन्यांनी पुढे यावे, यासह अनेक अटी ते लादत आहेत. जीवाश्म इंधनाचा मुद्दा थेट मांडण्यास सौदी अरेबियासह अन्य देशांनी नकार दिला. परिणामी २००९नंतर प्रथमच ‘कॉप’ परिषद कोणत्याही निर्णयाविना संपली.
आजपर्यंतच्या हवामान परिषदेतील सर्वांत वाईट परिषद, असे या परिषदेचे वर्णन काही तज्ज्ञांनी केले. त्यांचा रोख युरोपीय देशांवर होता. युरोपीय देशही जीवाश्म इंधनावर अवलंबून असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. भारतही हीच भूमिका मांडत आला आहे. प्रगत देशांनी इंधनाचा स्वैर वापर करून भौतिक विकास साध्य केला. त्यानंतर हवामान बदलाचे दुष्परिणाम दिसू लागल्यानंतर ते ‘ हरित ऊर्जा , स्वच्छ ऊर्जा’ अशा शब्दांची पेरणी करून विकसनशील देशांनाही जबाबदार धरत आहेत. उत्सर्जनाच्या बाबतीत हा इतिहास लक्षात घेतला जावा आणि प्रगतिपथावर असलेल्या देशांवर जुन्या उत्सर्जनाचा भार टाकला जाऊ नये, अशी भूमिका भारताने यंदा पुन्हा एकदा मांडली.
कार्बनच्या उर्वरित वापराबाबत समानता ठेवण्याचा भारताचा मुद्दाही रास्त होता. थोडक्यात, हवामान बदलाचे वास्तव बहुतेक देशांना मान्य आहे; परंतु ते रोखण्यासाठी कृतीची वेळ येताच बहुतेक देश स्वत:च्या अर्थव्यवस्थेला अधिक प्राधान्य देतात, हा आजवरचा अनुभव आहे. यंदाच्या परिषदेतही त्याचेच प्रत्यंतर आले. उत्सर्जनाची स्थिती अशीच कायम राहिल्यास विनाशाचे टोक लवकर येऊ शकते याची कल्पना असूनही कृतिशीलता दिसत नाही. त्यामुळे हवामान बदलाच्या उपायाबद्दलची चर्चा ही नेहमी निष्फळ आणि अपूर्ण राहते.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.