मुंबई : मरीन ड्राइव्हवर पादचाऱ्यांसाठी हिरवा सिग्नल असतानाही तो पूर्णपणे दुर्लक्षित करुन लाल सिग्नल ओलांडणाऱ्या टॅक्सी चालकाला 'पूर्णपणे निष्काळजी' ठरवत मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने सध्या २४ वर्षांच्या असलेल्या तरुणाला १.१५ कोटी रुपयांहून अधिक नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला आहे. २०१८ मध्ये झालेल्या या अपघातात कांदिवलीतील गौतम झा नामक तरुण (जो तेव्हा १६ वर्षांचा विद्यार्थी होता) गंभीर मेंदूच्या दुखापतीला बळी पडला आणि त्याला कायमस्वरुपी दिव्यांगत्व आले.
विमा कंपनीने उपस्थित केलेला 'सह-निष्काळजीपणा' (contributory negligence) चा युक्तिवाद फेटाळून लावत मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने स्पष्ट केले की, अतिवेगात असलेल्या टॅक्सीने गौतम झा याचा मार्ग अडवला होता. तो त्यावेळी अपघातप्रवण परिसर म्हणून ओळखला जाणाऱ्या कैवल्यधाम सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंगचा वापर करत होता.
टॅक्सीचे सिग्नलकडे पूर्णपणे दुर्लक्षन्यायाधिकरणाने सांगितले की, गौतम झाच्या साक्षीतून हे सिद्ध होते की, पादचाऱ्यांसाठी हिरवा सिग्नल असताना तो झेब्रा क्रॉसिंगवरुन जात होता. शुक्रवारी या प्रकरणावर भाष्य करताना सदस्य एम. जी. देशपांडे म्हणाले, "जेव्हा पादचाऱ्यांसाठी हिरवा सिग्नल असतो, तेव्हा टॅक्सीने तो सिग्नल तोडून पुढे येण्याचे कारणच काय? उलट, टॅक्सी चालकाचे हे कृत्य स्पष्ट करते की, त्याने पादचाऱ्यांसाठी असलेल्या हिरव्या सिग्नलकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून पादचाऱ्यांचा मार्ग अडवण्याचा प्रयत्न केला."
न्यायाधिकरणाने म्हटले की, "लाल सिग्नल असताना टॅक्सी चालकाने पादचाऱ्यांचा मार्ग अडवण्याचे कोणतेही कारण नव्हते." परिसराचा उल्लेख करत न्यायाधिकरणाने नोंदवले की, "मरीन ड्राइव्हवरील कैवल्यधाम समोरील झेब्रा क्रॉसिंग हे अपघातांसाठी कुप्रसिद्ध ठिकाण आहे आणि तिथे अनेक पादचाऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत."
गौतमला तरुण वयात गंभीर समस्यान्यायाधिकरणाने सांगितले की, गौतम झा याला तरुण वयातच गंभीर परिणामांना सामोरे जावे लागले आहे; ज्यामध्ये स्मरणशक्ती कमी होणे, शिक्षण सुरु ठेवण्यात अडचणी येणे, तसेच रोजगार आणि विवाहाच्या संधींवर विपरीत परिणाम होणे यांचा समावेश आहे.
न्यायाधिकरणाने प्रश्न उपस्थित केला, "एखादा हुशार विद्यार्थी, ज्याने आपली कारकीर्द, सर्व संधी, भविष्यातील मार्ग, रोजगाराच्या आशा आणि विवाहाच्या शक्यता गमावल्या आहेत, त्याला केवळ ४०% कायमस्वरूपी दिव्यांगत्व आले आहे असे कसे म्हणता येईल? नक्कीच नाही. वस्तुतः, त्याचे दिव्यांगत्व हे ८०% 'कायमस्वरूपी कार्यात्मक अपंगत्व' (Permanent Functional Disability) मानले पाहिजे, ज्याचा परिणाम त्याच्या संपूर्ण आयुष्यावर, क्षमतेवर आणि भविष्यावर झाला आहे."
टॅक्सी चालकच पूर्णपणे जबाबदारन्यायाधिकरणाने असा निष्कर्ष काढला की, या अपघातासाठी केवळ टॅक्सी चालकच पूर्णपणे जबाबदार (निष्काळजी) आहे. झा यांनी असा दावा केला होता की, १ जुलै २०१८ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास, ते आपल्या मित्रांसोबत मरीन ड्राइव्हवरील कैवल्यधाम सिग्नलजवळ एन. एस. रोड ओलांडत होते, तेव्हा पादचाऱ्यांसाठीचा सिग्नल हिरवा होता. यावेळी इम्रान मन्सूरी यांची मालकीची आणि रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडकडे विमा उतरवलेली एक टॅक्सी भरधाव वेगाने आली आणि त्यांना धडकली.
न्यायाधिकरणाने दिव्यांगत्व प्रमाण वाढवलेगौतम झा यांना जसलोक रुग्णालयात नेण्यात आले, तिथे त्यांना मेंदूला गंभीर दुखापत (सीव्हिअर ट्रॉमेटिक ब्रेन इंज्युरी) झाल्याचे निदान झाले. वैद्यकीय प्राधिकरणाने त्यांना 'राईट हेमिपेरेसिस' (शरीराच्या संपूर्ण उजव्या बाजूला स्नायू कमकुवत होणे किंवा अंशतः अर्धांगवायू होणे) असल्याचे प्रमाणित केले, त्यामुळे त्यांना मेंदूशी संबंधित ४०% कायमस्वरूपी शारीरिक दिव्यांगत्व आले आहे. मात्र, न्यायाधिकरणाने त्यांच्या शिक्षणावर, स्मरणशक्तीवर, करिअरच्या संधींवर आणि भविष्यातील कमाईच्या क्षमतेवर या दुखापतीचा झालेला परिणाम विचारात घेऊन, त्यांच्या कार्यात्मक दिव्यांगत्वाचे (फंक्शनल डिसॅबिलिटी) प्रमाण ८०% इतके निश्चित केले.