मुंबई : भारत आणि न्यूझीलंडमधील पहिल कसोटी सामना अनिर्णित राहिला होता. या सामन्यात गोलंदाजांनी आपल्या क्षमतेची पूर्ण ताकद पणाला लावली. मात्र, बेसिन रिझर्व्ह मैदानाची निष्प्रभ खेळपट्टी भारताच्या विजयाच्या आड आली. न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी संयमी फलंदाजी करून भारताविरुद्धची पहिली कसोटी अनिर्णित राखली. या बरोबरीमुळे जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या भारताच्या शक्यतांना आणखी धक्का बसला. मालिकेतील दुसरी कसोटी २७ नोव्हेंबरपासून खाइस्टचर्च येथे खेळली जाणार आहे. या सामन्यात शेवटच्या दिवशी गोलंदाजांना मदत नव्हती पण जीव ओतणाऱ्या गोलंदाजाची कमी नक्कीच जाणवली. जे आपल्याला मोहम्मद सिराजमध्ये पाहायला मिळते. कारण सामन्याच्या अशा परिस्थिती तो एकटा एक बाजू लावून धरतो. हे आपण अनेकदा पाहिले आहे. सामना अनिर्णित झाल्यावर याचाच धागा पकडत माजी क्रिकेटर अजिंक्य रहाणे याने थेट भाष्य केले.
अजिंक्य रहाणे काय म्हणाला? सिराज असायला हवा होता. चौथ्या किंवा पाचव्या दिवशी विकेट घेणारा गोलंदाज संघात गरजेचा आहे. तुम्ही केवळ पहिल्या तीन दिवसांसाठी नाही, तर पाचव्या दिवशीही त्याच ताकदीने खेळणाऱ्या खेळाडूंची निवड करायला हवी. ज्यांना संधी मिळाली त्यांच्याविरोधात मी बोलत नाही, पण संघात अनुभवाची नितांत गरज आहे, हाच अनुभव पाचव्या दिवशी कमी पडला, असे अजिंक्य रहाणेने म्हटलं आहे. या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना कर्णधार याने सिराजच्या न झालेल्या निवडीवर स्पष्टीकरण दिले.
'मित्राला वगळणे अवघड'एखाद्या जवळच्या मित्राला संघातून वगळणे सोपे नसते, विशेषतः जेव्हा त्या दोघांची कसोटी कारकीर्द एकत्र सुरू झाली असेल. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत मोहम्मद सिराजला अंतिम अकरामधून वगळताना भारतीय कर्णधार शुभमन गिलला वैयक्तिक संबंध बाजूला ठेवून निर्णय घ्यावा लागला. गिल आणि सिराज यांनी डिसेंबर २०२० मध्ये मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 'बॉक्सिंग डे' कसोटीद्वारे पदार्पण केले होते. तेव्हापासून दोघांमध्ये चांगली मैत्री आहे; मात्र वेलिंग्टन कसोटीत गिलने फॉर्मात असलेल्या गोलंदाजांना संधी देण्याचा निर्णय घेतला.
'सिराज उत्कृष्ट खेळाडू आणि शानदार गोलंदाज आहे. त्याने भारतासाठी खूप चांगली कामगिरी केली आहे. यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे तो माझा खूप चांगला मित्र आहे. आम्ही एकत्र कसोटी पदार्पण केले होते. भारताकडून खेळण्यापूर्वीही आम्ही चांगले मित्र होतो. त्यामुळे त्याला संघातून वगळणे माझ्यासाठी खरोखरच कठीण होते; पण कधी कधी कोणते गोलंदाज फॉर्मात आहेत आणि कोण सर्वोत्तम गोलंदाजी करत आहे, हे पाहावे लागते,' असे गिलने सांगितले.
सामन्यापूर्वी सिराजशी वैयक्तिकरीत्या बोलून त्याला या निर्णयाची माहिती दिली होती, असेही गिलने स्पष्ट केले. 'माझे सिराजशी बोलणे झाले होते. सामन्यापूर्वीच त्याला कल्पना दिली होती. तो या निर्णयाशी सहमत होता की नाही, हे मला माहीत नाही; पण त्याला यामागची भावना समजली होती. दुसऱ्या खेळाडूची निवड का केली, याचा अंदाज त्याला आला होता,' असेही गिल म्हणाला.