म. टा. प्रतिनिधी, नागपूर : प्रवासी आणि मालवाहतुकीचा वाढता भार लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गांच्या कामांना गती देण्यात आली आहे. नागपूर-इटारसी, नागपूर-वर्धा आणि भुसावळ-बडनेरा-वर्धा या महत्त्वाच्या मार्गांवर विविध टप्प्यांत काम सुरू आहे. तिसऱ्या रेल्वे मार्गातील नागपूर ते चिचोंडा दरम्यानचा १२९ किलोमीटरचा टप्पा पूर्ण होऊन वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. उर्वरित काम मार्च २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे रेल्वेचे उद्दिष्ट आहे.

इटारसी-नागपूर तिसऱ्या रेल्वे मार्गाची एकूण लांबी २९७ किलोमीटर आहे. त्यापैकी नागपूर-चिचोंडा हा १२९ किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला आहे. मुलताई-आमला या २३ किलोमीटरच्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात असून जानेवारी २०२७ पर्यंत तो वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. आमला-मरामझिरी, मरामझिरी- धाराखोह आणि धाराखोह-टाकू या विभागांतही काम सुरू आहे. विभागात दोन बोगदे तयार केले जात आहेत.

सध्या भूसंपादन प्रक्रिया सुरू असून निविदा प्रक्रियेचे नियोजन केले जात आहे. वर्धा-नागपूर तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्ग प्रकल्पाची एकूण लांबी प्रत्येकी ७८.७ किलोमीटर आहे. या प्रकल्पातील हा ६१.५५ किलोमीटरचा दोन्ही मार्गांचा टप्पा पूर्ण करून वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. उर्वरित अजनी-नागपूर आणि सेवाग्राम-वर्धा या विभागांत काम सुरू आहे. सेवाग्राम येथे रेल्वे फ्लायओव्हरची निर्मितीही केली जात आहे. या प्रकल्पांमुळे विदर्भातील रेल्वे मार्गांची क्षमता वाढणार असून प्रवासी आणि मालगाड्यांसाठी अतिरिक्त मार्ग उपलब्ध होतील. रेल्वे वाहतुकीतील कोंडी कमी होऊन गाड्यांच्या वेळापत्रकात सुधारणा होण्यास मदत होईल.

कोणत्या टप्प्यावर काय ?
इटारसी-नागपूर तिसऱ्या मार्गातील २९७ किलोमीटरपैकी नागपूर-चिचोंडा हा १२९ किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला आहे. मुलताई-आमला टप्पा जानेवारी २०२७ पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. चौथ्या मार्गाच्या अहवालाला मंजुरी मिळाली असून भूसंपादन सुरू आहे. वर्धा-नागपूर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गातील सेवाग्राम-अजनी टप्पा पूर्ण झाला असून अजनी-नागपूर आणि सेवाग्राम-वर्धा विभागांत काम सुरू आहे

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.