मुंबई : बोरीवली रेल्वे स्थानकावर एसी लोकलच्या महिला डब्यातून बाहेर जाण्यास सांगितल्यामुळे एका हुल्लडबाजाने रेल्वेच्या वरिष्ठ ट्रेन मॅनेजरवर मोबाईल फोनने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या झटापटीत ट्रेन मॅनेजरच्या डोक्याला दुखापत झाली आणि त्यांना रक्तस्त्राव झाला. रविवारी सकाळी ही घटना घडली.

३० वर्षीय तरुणाला अटक३० वर्षीय हल्लेखोराचे नाव हर्षिल भरतकुमार जैन आहे. तो मुंबईतील येथील रहिवासी आहे. तो इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रात काम करतो. बोरीवली रेल्वे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

ही घटना रविवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. चर्चगेटवरुन सकाळी ७ वाजता सुटलेली एसी लोकल बोरीवली स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र. २ वर आली होती. तेव्हा वरिष्ठ ट्रेन मॅनेजर प्रियेश सूर्यभान गिरी (३७) यांना महिला डब्यात एक व्यक्ती झोपलेली दिसली.

झोपलेल्या तरुणाला उठवलंलोअर परळ येथील रेल्वे कर्मचारी वसाहतीत राहणारे प्रियेश गिरी त्या ट्रेनवर ड्युटीवर होते. ट्रेन एक्झामिनर याकूब शेख आधीच त्या प्रवाशाला उठवण्याचा प्रयत्न करत होते; गिरी तिथे पोहोचल्यावर त्यांना परिस्थितीची माहिती देण्यात आली.

रेल्वे कर्मचाऱ्यांनी हर्षिलला सांगितले की, तो महिला डब्यात प्रवास करत आहे. त्यांनी त्याला सामान्य डब्यात जाण्यास किंवा ट्रेनमधून उतरण्यास सांगितले. यावर तो त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी कर्मचाऱ्यांशी वाद घालू लागला आणि त्यांना अपशब्द वापरु लागला.

झटापटीत फोनने डोक्यावर प्रहाररेल्वे कर्मचाऱ्यांनी जेव्हा हर्षिलला पकडून डब्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा परिस्थिती अधिकच चिघळली. या झटापटीदरम्यान, त्याने आपल्या हातातील मोबाईल फोनने गिरींच्या डोक्यावर प्रहार केला, त्यामुळे त्यांना दुखापत होऊन रक्तस्त्राव सुरू झाला.

दुखापत झालेली असूनही, प्रियेश गिरी आणि याकूब शेख यांनी हर्षिलला डब्यातून बाहेर काढले आणि रेल्वे कंट्रोल रुमला याची सूचना दिली.

माहिती मिळताच आरपीएफचे हेड कॉन्स्टेबल सुनील नरवाल महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान विपुल पाटील प्लॅटफॉर्मवर पोहोचले. रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्यांना घडलेला प्रकार सांगितला, त्यानंतर हर्षिल जैन याला बोरीवली रेल्वे पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

ही घटना सकाळी स्थानकावरील गर्दीच्या वेळी घडली. या काळात रेल्वे कर्मचारी सहसा महिला डब्यात प्रवास करणाऱ्या पुरुषांची तपासणी करत असतात.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.