Ganadhipa Sankashti Chaturthi Story: कार्तिक कृष्ण चतुर्थीला गणाधिप गणेशाची पूजा केली जाते. यंदा 27 नोव्हेबंर 2026 रोजी गणाधिप संकष्टी चतुर्थी साजरी केली जाणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार गणाधिप संकष्टी चतुर्थीचे व्रत करून पूजा केली असता जीवनातील समस्या कमी होतात. गणाधिप म्हणजे समस्त गणांचे (देवता, यक्ष आणि गंधर्व) अधिपती तसेच महादेवाचे प्रमुख सेनापती. गणपतीचे हे स्वरूप शक्ती, नेतृत्व आणि संकटातून मुक्ती मिळवून देणारे मानले जाते. गणाधिप संकष्ट चतुर्थीनिमित्त शिवशंकराने पार्वतीमातेला सांगितलेली कथा जाणून घेऊया. ही कथा शंकर आणि माता पार्वती यांच्या संवादावर आधारित आहे.

एकदा कैलास पर्वतावर माता पार्वती यांनी भगवान शंकरांना विचारले, "हे महादेव! कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला भगवान गणेशाच्या कोणत्या स्वरूपाची पूजा केली जाते? कृपया या व्रताचे महत्त्व आणि कथा सांगा."

तेव्हा महादेव हसून म्हणाले, "हे देवी! कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला विघ्नहर्त्या गणेशाच्या 'गणाधिप' स्वरूपाची पूजा केली जाते. हे व्रत विशेषतः अशा लोकांसाठी अत्यंत फलदायी आहे, जे चारही बाजूंनी शत्रूंनी घेरलेले असतात किंवा मोठ्या संकटात सापडलेले असतात. ऐक, मी तुला एका प्राचीन राजाची कथा सांगतो."

प्राचीन काळी शूरसेन देशात विक्रमसेन नावाचा एक अत्यंत पराक्रमी आणि धर्मनिष्ठ राजा राज्य करत होते. त्याचे राज्य सर्व अत्यंत सुखी आणि समृद्ध होते. तो प्रजेवर पित्याप्रमाणे प्रेम करत असे आणि जनतेची काळजी घेत असे. एकदा राजा विक्रमसेनला शेजारील राज्यातून आमंत्रण आहे. हा राजा कपटी होता पण आमंत्रण मिळाल्यामुळे राजा विक्रमसेन शेजारील राज्यात दाखल झाले.त्या कपटी राजाने विक्रमसेन यांना एका मोठ्या कटात अडकवले. त्याने आपल्या विशाल सैन्याच्या मदतीने राजा विक्रमसेन यांच्या छावणीला चारही बाजूंनी घेरले.

राजा विक्रमसेन यांच्याकडे फार थोडे सैन्य होते. शत्रूचे सैन्य मात्र विशाल आणि भयानक होते. राजा आणि त्यांच्या सैनिकांसमोर पुढे जाण्याचा किंवा मागे परतण्याचा कोणताही मार्ग नव्हता. परिस्थिती अत्यंत भीतीदायक होती म्हणजे साक्षात मृत्यू समोर उभा होता.

राजा विक्रमसेन यांचे कुलगुरू आणि पुरोहितही त्यांच्यासोबत होते. राजा निराश होऊन पुरोहितांना म्हणाले, "हे गुरुदेव! आता केवळ ईश्वरच आम्हाला या मृत्यूच्या पाशातून बाहेर काढू शकतो. सगळ्यांचे प्राण वाचवण्यासाठी काही उपाय सांगा."

तेव्हा पुरोहितांनी पंचांग पाहिले आणि म्हणाले, "महाराज! आज कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी आहे. हा 'गणाधिप संकष्टी'चा पवित्र दिवस आहे. गणाधिप गणेश हे समस्त गणांचे अधिपती आहेत. त्यांच्या इच्छेने अशक्य गोष्टही शक्य होऊ शकते. आपण आणि आपल्या संपूर्ण सैन्याने आज निराहार राहून गणाधिप गणेशाचे व्रत करावे."

राजा विक्रमसेन यांनी त्वरित व्रताचा संकल्प केला. युद्धभूमीवरील छावणीत जे काही थोडेफार दुर्वा, जंगली फुले आणि गूळ उपलब्ध होते, त्याचाच वापर करून त्यांनी मातीचे गणेश तयार केले आणि पूर्ण श्रद्धेने गणेशाच्या 'गणाधिप' स्वरूपाची पूजा केली.

दिवसभर सर्व सैनिकांनी अन्न-पाण्याचा त्याग करून गणपतीचे स्मरण केले. रात्री चंद्रोदयानंतर राजाने युद्धभूमीवरच चंद्राला अर्घ्य दिले आणि हात जोडून गणाधिप गणेशाची प्रार्थना केली.

"हे गणाधिप! हे संकटमोचन! आज आमचे रक्षण करणे केवळ तुमच्याच हातात आहे. आम्हा सगळ्यांना मृत्यूच्या जाळ्यातून सुरक्षित बाहेर काढा."

राजाची आर्त हाक आणि सगळ्यांनी केलेली प्रार्थना गणाधिप गणेशापर्यंत पोहोचली. त्याच रात्री एक अद्भुत चमत्कार घडला. गणाधिप गणपतीच्या कृपेने अचानक भयंकर वादळ सुरू झाले. शत्रूच्या विशाल सैन्याच्या छावण्यांमध्ये गोंधळ उडाला. अंधार आणि गोंधळामुळे शत्रूच्या सैनिकांनी एकमेकांनाच राजा विक्रमसेन यांचे सैन्य समजून परस्परांवर हल्ले केले. संपूर्ण रात्र शत्रूच्या सैन्यात हाहाकार माजला.

सकाळ झाल्यावर राजा विक्रमसेन यांनी पाहिले की शत्रूच्या विशाल सैन्याचा नाश झाला होता आणि कपटी राजा स्वतः बंदी अवस्थेत पडला होता. राजा विक्रमसेन यांनी एकही बाण न चालवता केवळ गणाधिप गणेशाच्या कृपेने अशक्य वाटणारा विजय मिळवला होता.

राजा विक्रमसेन आपल्या सैन्यासह सुरक्षितपणे आपल्या राज्यात परतले. त्यांनी आपल्या राज्यात गणाधिप गणेशाचे भव्य मंदिर बांधले आणि दरवर्षी कार्तिक संकष्टीचे व्रत करण्यास सुरुवात केली.

शिव शंकर माता पार्वती यांना म्हणाले, "हे देवी! कार्तिक संकष्टी चतुर्थीला गणाधिप गणेशाचे हे व्रत केल्याने जीवनातील अशक्य वाटणारे अडथळेही दूर होतात. राजकारण, सैन्य किंवा कोणत्याही मोठ्या संकटात अडकलेल्या व्यक्तीचे गणाधिप गणेश रक्षण करतात आणि त्याला विजय मिळवून देतात."

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.