अनिकेत यादव, अहिल्यानगर : ऊसदराच्या प्रश्नावरून अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांमधील संघर्ष आता अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ऊसतोड बंद ठेवण्याबाबत प्रशासनाने साखर कारखानदारांना निर्देश दिले असून, २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावली आहे. मात्र, 'या बैठकीतून दोन दिवसांत ठोस निर्णय झाला नाही, तर रस्ता रोको आंदोलन केले जाईल. त्यानंतरही प्रश्न सुटला नाही, तर रेल्वे रोको आंदोलनही करू', असा आक्रमक इशारा खासदार निलेश लंके यांनी दिला आहे.
खासदार निलेश लंके यांनी प्रशासनाला थेट इशाराप्रशासनाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३ नुसार साखर कारखानदारांना बैठकीस स्वतः उपस्थित राहण्याचं बंधन घातलं आहे. 'कोणत्याही प्रतिनिधी अथवा व्यवस्थापकीय संचालकांना पाठवू नये', असेही आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच शेतकरी संघटनांच्या मागणीनुसार '२५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत तोडणी झालेल्या उसाचे गाळप करून, २६ नोव्हेंबरपर्यंत सर्व साखर कारखान्यांनी ऊसतोड स्थगित ठेवावी', असे निर्देश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार निलेश लंके यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे.
'राजकीय पदांपेक्षा शेतकऱ्यांचे हित मोठे''दोन दिवसांत ऊसदराच्या प्रश्नावर निर्णय झाला नाही, तर रस्त्यावर उतरून रस्ता रोको करू. त्यानंतरही प्रशासन आणि कारखानदारांना जाग आली नाही, तर रेल्वे रोको आंदोलनही करू. काय व्हायचे ते होऊ द्या', अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. यावेळी लंके यांनी आपल्या राजकीय पदांपेक्षा शेतकऱ्यांचे हित मोठे असल्याचं स्पष्ट केलं. 'मला आमदारकी किंवा खासदारकीपेक्षा माझा शेतकरी महत्त्वाचा आहे. माझ्या शेतकऱ्यांसाठी आणि गोरगरीब जनतेसाठी कोणालाही अंगावर घेण्याची माझी तयारी आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी कोणत्याही टोकाला जाण्याची वेळ आली, तरी मागे हटणार नाही', असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे आता २६ नोव्हेंबरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. या बैठकीत ऊसदराचा तिढा सुटणार की शेतकरी आंदोलनाची धग रस्ता रोको आणि रेल्वे रोकोपर्यंत पोहोचणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
साखर कारखानदार रिकव्हरी चोरून काळा पैसा जमवतातसाखर कारखान्यांकडून होणाऱ्या कथित रिकव्हरी चोरीचा मुद्दा उपस्थित करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी साखर कारखानदारांवर गंभीर आरोप केले आहेत. '२०११ पूर्वी अनेक कारखान्यांची साखर उतारा क्षमता १२ टक्क्यांच्या पुढे होती. मात्र, आता एक टक्का रिकव्हरी कमी दाखवली जाते. म्हणजेच प्रत्येक टक्का रिकव्हरीमागे १० किलो साखरेची चोरी होत आहे', असा आरोप शेट्टी यांनी केला. या माध्यमातून कारखानदारांकडून काळा पैसा तयार केला जात असल्याचा दावाही त्यांनी केला. खासदार निलेश लंके यांच्यासमोर बोलताना शेट्टी यांनी या कथित काळ्या पैशाच्या राजकीय वापरावर थेट बोट ठेवले. 'कारखान्यांच्या अधिकृत हिशेबात हा पैसा दाखवला जात नाही. या साखरेची विक्री काळ्या बाजारात केली जाते आणि त्यातून मिळणाऱ्या पैशावर पाच टक्के जीएसटीही भरला जात नसल्याने सरकारचीही फसवणूक होत आहे', असा आरोप त्यांनी केला.
'लंके साहेब, तुमच्या विरोधातही हाच पैसा वापरला जातो'शेट्टी यांनी आपल्या भाषणात थेट खासदार निलेश लंके यांनाच उद्देशून सवाल केला. ते म्हणाले, 'या कारखानदारांकडून रिकव्हरीच्या माध्यमातून तयार होणारा काळा पैसा जिल्हा बँकेच्या निवडणुकीपासून विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांपर्यंत वापरला जातो. हाच पैसा तुमच्या विरोधातही वापरला जातो. तरीदेखील हेच कारखानदार गावात आले की त्यांच्या पायावर पाणी टाकता, त्यांची आरती करता. तुम्ही जे काही करता, त्याचे फळही तुम्हालाच मिळतं', अशी बोचरी टिप्पणी त्यांनी केली.