म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : कंत्राटी बसगाड्यांवर कोट्यवधी रुपये खर्च करूनही अपेक्षित आर्थिक लाभ मिळत नसल्याची बाब समोर आल्याने बेस्ट प्रशासनाने आता या व्यवस्थेचा सविस्तर हिशेब तपासण्याचा निर्णय घेतला आहे. भाडेतत्त्वावरील बसगाड्यांचे ‘परफॉर्मन्स ऑडिट’ करून त्यांच्या आर्थिक कामगिरीपासून ते रस्त्यांवरील सुरक्षिततेपर्यंत सर्व बाबींची छाननी केली जाणार आहे. त्यामुळे विद्यमान करारांचे पुनरावलोकन करून अटी अधिक कठोर करण्याचे संकेत बेस्ट उपक्रमाच्या यांनी दिले.
आगामी काही वर्षांत बेस्टला तब्बल १३ हजार बसगाड्यांची आवश्यकता भासणार असल्याचे त्यांनी बैठकीत सांगितले. यापूर्वी २०२८ पर्यंत १० हजार बसगाड्या ताफ्यात आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. भाडेतत्वावरील पद्धतीत कंत्राटदारांना ठरावीक किलोमीटरच्या हमीनुसार मोबदला दिला जातो. मात्र, प्रत्यक्ष सेवेत बसगाड्यांची उपलब्धता, त्यांची मासिक कामगिरी आणि आर्थिक परतावा यांचा ताळमेळ तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रत्येक बसगाडीची महिन्यागणिक कामगिरी, परिचालनातील अडचणी आणि अपघातांची नोंद यांची तपासणी केली जाणार आहे.
सुविधांचा आढावा 'बेस्ट' उपक्रमाला स्विच मोबिलिटीकडून १५० इलेक्ट्रिक डबल डेकर बसगाड्या लवकरच मिळण्याची अपेक्षा आहे. ओलेक्ट्रा ग्रीनटेकची उपकंपनी एव्ही ट्रान्सकडून आणखी २ हजार ३०० बसगाड्यांची डिलिव्हरी मिळवण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. या बसगाड्यांसाठी आगारातील जागेचे वाटप आणि चार्जिंग सुविधांचा आढावा पुढील काही आठवड्यांत घेतला जाणार आहे. केंद्र सरकारच्या १ हजार ५०० कंत्राटी बसगाड्या मिळण्याची अपेक्षा आहे.
२,३५२ कोटींची ग्रॅच्युइटी थकीत आगाराच्या मिळणाऱ्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी पुनर्विकासातून महसुलाकडे प्रशासनाचे लक्ष आहे. या प्रकल्पातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा विनियोग कर्मचाऱ्यांची प्रलंबित देणी भागवणे आणि नव्या बसगाड्या खरेदी करणे यासाठी केला जाणार असल्याचे सेठी यांनी स्पष्ट केले. मार्चपर्यंतची ग्रॅच्युइटीची २, ३५२ कोटी रुपयांची देणी प्रलंबित आहेत.