नवी दिल्ली: रक्ताच्या नात्यातील लग्न आणि त्यातून होणार्या बाळांच्या आरोग्यावर होणारे संभाव्य परिणाम यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला नोटिस बजावली आहे. रक्ताच्या नात्यात होणाऱ्या विवाहांबद्दल जनजागृती वाढण्याची गरज न्यायालयानं बोलून दाखवली. कोणी कोणासोबत लग्न करावं हा प्रत्येकाच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा विषय आहे. त्यावर थेट बंदी घालण्याचा अधिकार न्यायालयाकडे नाही. पण यासंदर्भात कायदा करण्याचा किंवा जनजागृती अभियान राबवण्याबद्दल विचार केला जाऊ शकतो, असं न्यायालयानं म्हटलं.
हे प्रकरण बंगळुरूत राहणाऱ्या चार्वी एस यांच्या याचिकेशी संबंधित आहे. चार्वी नॅशनल स्कूल ऑफ इंडिया विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे. चार्वीची ४० टक्के दृष्टी प्रभावित झाली आहे. आपले आई, वडील रक्ताचे नातेवाईक असल्याचं चार्वीनं याचिकेत नमूद केलं आहे. जन्मापासून डोळ्यांशी संबंधित आनुवांशिक आजाराचा सामना करावा लागत असल्याचं चार्वीनं याचिकेत म्हटलं आहे.
सर्वोच्च न्यायालयानं काय म्हटलं?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय घटनापीठानं या प्रकरणावर सुनावणी घेतली. या घटनापीठात न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांचा समावेश होता. रक्ताच्या नात्यातील विवाह रोखण्याचे आदेश देणं आमच्या अखत्यारित येत नसल्याचं सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी दरम्यान म्हटलं.
या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला नोटिस जारी केली आहे. 'जवळच्या रक्ताच्या नात्यातील लग्नाचे संभाव्य नकारात्मक परिणामांचा विचार करून त्यासंदर्भात कायदा करण्याचा आणि शाळा-महाविद्यालयातील पाठ्यपुस्तकासह अन्य माध्यमातून व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याचा विचार करावा,' असा सल्ला सर्वोच्च न्यायालयानं दिला. लग्न हा वैयक्तिक स्वातंत्र्याचा विषय आहे. त्यामुळे लोकांना निवडीचं स्वातंत्र्य असायला हवं. पण त्या सोबतच आरोग्याशी संबंधित संभाव्य धोके लक्षात घेऊन निर्णय घ्यायला हवेत, असं आवाहनही न्यायालयानं केलं.
रक्ताच्या नात्यातील लग्नातून होणाऱ्या मुलांवर काय परिणाम होतात?
जवळच्या रक्ताच्या नात्यात लग्न केल्यास होणाऱ्या मुलांना होणाऱ्या आनुवांशिक आजारांचा धोका वाढू शकतो. अशा मुलांना पाहण्याशी, ऐकण्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यांना आनुवांशिक आजार होण्याची शक्यताही अधिक असते, असा दावा याचिकाकर्त्यानं केला आहे. त्यासाठी काही वैद्यकीय संशोधनांचा दाखलाही देण्यात आला आहे. दक्षिण भारतातील काही भागांमध्ये अशा प्रकारच्या विवाहांचं प्रमाण अधिक आहे. काही ठिकाणी हा आकडा २८ ते ३० टक्क्यांच्या घरात असल्याचा उल्लेख याचिकेत आहे. ग्रामीण भागात पुरेशी जनजागृती नसल्यानं अशा लग्नांचं प्रमाण अधिक आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.