मुंबई: मराठी छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय आणि सामान्य माणसाच्या ज्ञानाचा कस पाहणारा कार्यक्रम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ' कोण होणार करोडपती ' या शोवर सध्या प्रेक्षक नाराज असल्याचं चित्र आहे.

प्रश्न उत्तरांच्या या शोला सध्या प्रेक्षकांच्या तीव्र रोषाला सामोरं जावं लागत आहे. यंदाच्या पर्वात सामान्य स्पर्धकांऐवजी हिंदी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींना अधिक पसंती दिली जात असल्याचं म्हणत करत नेटकऱ्यांनी या शोला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

सध्या सुरू असलेल्या Kon Honaar Crorepati च्या नव्या पर्वाचे सूत्रसंचालन बॉलिवूडची 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षित करत आहे. माधुरी दीक्षित सूत्रसंचालक असल्यानं कार्यक्रमात बॉलिवूड आणि हिंदी मनोरंजन विश्वातील कलाकारांची प्रमोशनसाठी ये जा मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.


आतापर्यंत या पर्वात फराह खान, , रवीना टंडन यांसारख्या बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली आहे. तर कंटेंट क्रिएटर भुवन बाम हा देखील शोमध्ये आला होता. तर भोजपुरी अभिनेते रवी किशन देखील या शोमध्ये दिसले. एका मराठी रिॲलिटी शोमध्ये मराठी भाषिक सामान्य नागरिकांना आणि तळागाळातील बुद्धिमान स्पर्धकांना संधी मिळण्याऐवजी हिंदी सेलिब्रिटींचे प्रमोशन सुरू असल्याची भावना प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया चर्चेत

सोशल मीडियावर या शोचे प्रोमो आणि व्हिडीओ व्हायरल होत असताना कमेंट सेक्शनमध्ये प्रेक्षकांची नाराजी स्पष्टपणे दिसून येत आहे. एका नेटकऱ्यानं लिहिलं की, अरे सोनी मराठीवर कशाला सुरू केला मग शो. तर दुसऱ्या एका नेटकऱ्यानं म्हटलं की, काय फालतूपणा लावला आहे. आणि सगळे हिंदी, भोजपुरी कलाकार बोलवत आहात. बंद करा शो किंवा हिंदी चॅनल वर फिरवा हा शो. तर हा सामान्य माणसाच्या स्वप्नांचा मंच राहिला नसून हिंदी चित्रपटांच्या प्रमोशनचा अड्डा झाला आहे. अशा अनेक कमेंट्स सोशल मीडियावर वाचायला मिळत आहेत.



दरम्यान, या पूर्वी सचिन खेडेकर आणि नागराज मंजुळे, स्वप्नील दोशी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केलं होतं, तेव्हा सामान्य स्पर्धकांचे संघर्षमय प्रवास आणि त्यांच्या ज्ञानाचं कौतुक पाहायला मिळायचं. मात्र, यंदाच्या पर्वात सेलिब्रिटी पाहुण्यांचा भरणा अधिक असल्यानं कार्यक्रमाचा मूळ गाभा हरवत चालल्याची टीका होत आहे. आता प्रेक्षकांच्या या नाराजीची दखल घेत शोचे निर्माते पुढील भागांमध्ये सामान्य स्पर्धकांना अधिक प्राधान्य देणार का, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.