अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने जागतिक व्यापारात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडवून दिली आहे. अमेरिकेने हिंदुस्थानी वस्तूंवर २५ टक्क्यांपर्यंत आयात शुल्क (टॅरिफ) लावण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. हिंदुस्थानसह इतर सहा देशांवरही २५ टक्के शुल्क आकारण्याचे प्रस्तावित असून, चीनवर सर्वाधिक ४० टक्के टॅरिफ लावण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कार्यालयाच्या नव्या योजनेंतर्गत ज्या सात देशांवर २५ टक्क्यांपर्यंत टॅरिफ प्रस्तावित करण्यात आले आहे, त्यामध्ये हिंदुस्थानचा समावेश आहे. हिंदुस्थानव्यतिरिक्त कंबोडिया, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, मलेशिया, तैवान आणि थायलंड या सहा देशांचाही या २५ टक्के शुल्काच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
याशिवाय यूएसटीआरने इतर प्रमुख व्यापारी भागीदार देशांसाठीही नवे दर प्रस्तावित केले आहेत. यामध्ये बांगलादेश, युरोपीय महासंघ (EU), जपान, स्वित्झर्लंड आणि सिंगापूरसाठी २० टक्क्यांपर्यंत, व्हिएतनामसाठी ३५ टक्क्यांपर्यंत, तर चीनसाठी ४० टक्क्यांपर्यंत टॅरिफ दर प्रस्तावित करण्यात आले आहेत.