नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयानं कंटेट क्रिएटर्स , रील बनवणारे आणि मान्यता प्राप्त पत्रकार यांच्यातील सीमारेषा स्पष्ट केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलनाशी संबंधित प्रकरणावेळी न्यायालयानं याबद्दल भाष्य केलं. स्वयंघोषित पत्रकारांना मान्यता प्राप्त पत्रकारांप्रमाणे संरक्षण मिळणार नाही, असं न्यायालयानं म्हटलं.


मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात दिल्लीत आंदोलन सुरू असताना पत्रकारांसोबत गैरवर्तन झाल्याचे प्रकार घडले. यासंदर्भातील प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मान्यता प्राप्त पत्रकारांप्रमाणेच स्वंयघोषित पत्रकारांना सुरक्षा मिळेल, हे गरजेचं नाही, अशी टिप्पणी न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांनी केली.


सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी रील तयार करणाऱ्या आणि कंटेट क्रिएटर्ससाठी झटका मानला जात आहे. सध्याच्या घडीला कंटेट क्रिएटर्सची संख्या वाढली आहे. त्यांच्या कार्यपद्धतीवर दिल्ली पोलिसांनीही प्रश्न उपस्थित केले आहेत. 'आंदोलनांचं वार्तांकन करणाऱ्या मान्यता प्राप्त पत्रकारांना संरक्षण दिलं जातं. तसंच संरक्षण आम्हालाही मिळावं, असा दावा रील बनवणाऱ्या आणि कंटेट क्रिएटर्सना करता येणार नाही,' असं दिल्ली पोलिसांनी आधीच म्हटलं आहे.


'(एका पत्रकाराला) दर्जा स्वत:हून दिला जाणारा नाही. तुम्ही वर्तमानपत्राचे पत्रकार आहात, तुम्ही मान्यता (प्रेस काऊन्सिलच्या अंतर्गत) प्राप्त पत्रकार आहात. जर तुम्ही वृत्तपत्र, टीव्ही चॅनलचे पत्रकार आहात, तर त्या हिशोबानं तुम्ही मान्यता प्राप्त आहात. तुम्ही एक ऑनलाईन पत्रकारही असू शकता. तुम्ही नोंदणीकृत पत्रकारही असू शकता. पण आता आपण एक असा काळ पाहत आहोत, ज्यामध्ये लोक स्वत: पत्रकार असल्याचा दावा करतात. स्वयंघोषित पत्रकारांना मान्यता प्राप्त पत्रकारांसारखं संरक्षण मिळू शकत नाही,' असं न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.