मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुण्यातील गुन्हेगारीच्या घटनांवर भाष्य करताना पुण्याच्या पालकमंत्रीपदाबाबत वक्तव्य केलं होतं. त्यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपचे नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली. तसेच इतर नेत्यांनीदेखील टीका केली. यानंतर रोहित पवारांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं. आपल्याला कुणाचं मन दुखावण्याचा हेतू नव्हता. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं मन दुखावलं असेल तर आपण त्यांची माफी मागतो. पण आपण चुकीचे काही बोललो नाहीत, असंदेखील रोहित पवार म्हणाले. रोहित पवारांच्या या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता उमेश पाटील यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

"रोहीतजी, माफी मागायची आणि त्याचवेळी ‘मी चुकीचं बोललो नाही’ असंही म्हणायचं, मग नेमकी माफी कशाची मागितली? माफी मागून वक्तव्य मागे घेता येईल; पण त्या शब्दांनी केलेला अपमान, दुखावलेल्या भावना आणि त्याची दाहकता पुसता येत नाही. सुनेत्रावहिनींबद्दल बोलताना राजकीय टीका आणि व्यक्तिगत अवमान यांच्यातील मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत. सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या महिलांविषयी बोलताना शब्दांचे भान आणि जबाबदारी असणे हे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. स्व. यशवंतराव चव्हाणांच्या सुसंस्कृत राजकारणाचा वारसा सांगताना आपल्या बोलण्यातून आणि आचरणातूनही त्या संस्कारांचे दर्शन घडले पाहिजे", असं उमेश पाटील म्हणाले.

उमेश पाटील नेमकं काय म्हणाले?"वैचारिक विरोधाच्या नावाखाली आईसमान काकींचा अवमान करणे, ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाही! सुनेत्रावहिनी या केवळ लोकनेते अजितदादांच्या पत्नी नाहीत; त्या माजी खासदार असून आज उपमुख्यमंत्री आहेत. अजितदादांच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीत त्यांच्या सहचारिणी म्हणून त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत. अजितदादांनी स्वतः सुनेत्रावहिनींना राजकारणात संधी दिली, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला, याचाही विसर पडू नये", अशा शब्दांत उमेश पाटील यांनी सुनावलं.

"अजितदादांच्या कार्यशैलीचा गौरव करण्यासाठी सुनेत्रावहिनींच्या कार्यक्षमतेला कमी लेखण्याची आवश्यकता काय? अजितदादा हयात नसताना त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करायचा आणि त्यांच्याच अर्धांगी असलेल्या स्वत:च्या काकीचा अपमान करायचा, हा दुटप्पीपणाचा संस्कार कुठून आला?", असे सवाल उमेश पाटील यांनी केले.

" निर्णयांवर जरूर टीका करा. प्रशासनातील त्रुटींवर प्रश्न उपस्थित करा. आकडेवारीच्या आधारे सरकारला जाब विचारा. पण एखाद्या महिलेच्या नेतृत्वक्षमतेवर व्यक्तिगत टिप्पणी करणे आणि नंतर सशर्त माफी मागणे, यामुळे शब्दांची जबाबदारी संपत नाही. ‘वाईट वाटलं असेल तर माफी मागतो; पण मी चुकीचं बोललो नाही’, या भूमिकेत चूक स्वीकारल्याचे नेमके कुठे दिसते?", असादेखील सवाल त्यांनी केला.

"माफीची प्रामाणिकता केवळ शब्दांतून नव्हे, तर आचरणातून सिद्ध होत असते. राजकीय पदांपेक्षा संस्कार मोठे असतात. राजकीय मतभेदांपेक्षा नात्यांची प्रतिष्ठा मोठी असते. आणि राजकीय संघर्षापेक्षा महिलांचा सन्मान मोठा असतो. राजकारणात विरोध असावा, अवमान नव्हे! वैचारिक संघर्ष असावा, व्यक्तिगत द्वेष नव्हे! राजकीय महत्त्वाकांक्षेपेक्षा सुसंस्कृत राजकारणाची परंपरा मोठी आहे", असं उमेश पाटील रोहित पवारांना उद्देशून म्हणाले.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.