ठाणे : लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसने ठाण्यात भव्य संविधान बचाव रॅली काढली. महात्मा ज्योतीबा फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन संविधान बचाव रॅलीची सुरुवात करण्यात आली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी उपस्थितांना संविधान बचावची शपथ दिली.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यावेळी भाजपा सरकारवर तोफ डागत म्हणाले की, देशात संविधान निमिर्तीची पक्रिया सुरु असताना भारतीय जनता पक्ष नव्हता, त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होता, तत्कालीन सरसंघचालक गोलवलकर हे त्यावेळी मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पत्र पाठवून, सर्वात उत्कृष्ठ मानवाची संहिता ही मनुस्मृती आहे आणि देशाचे संविधान मनुस्मृतीनुसार लिहिले जावे हे सांगत होते. मनुस्मृती व बंच ऑफ थॉट्सला महत्व देणाऱ्या भाजपाला आज संविधानाचा पुळका आला आहे,ते फक्त पुतणा मावशीचे प्रेम आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान रद्द करून मनुस्मृती आणायची आहे. पण सध्या ते सत्तेत असून संविधान व लोकशाही बचावचा नारा देत मोर्चा काढत आहेत हे हास्यास्पद आहे. भाजपाचे संविधान प्रेम हे वरकरणी दाखवणाचे प्रेम आहे. भाजपा सरकार मागील १३ वर्षांपासून संविधानाची पायमल्ली करत आहे. राज्यात आलेले असंवैधानिक सरकार हे सुद्धा ठाण्यातून आले होते. ठाण्यात कायदा व सुव्यवस्थाही अत्यंत बिघडलेली आहे, हत्या होत आहेत, संविधान धोक्यात आलेले आहे म्हणून संविधान रक्षणाचा संदेश देण्यासाठी ठाण्यातून संविधान बचाव रॅली आयोजित करण्यात आली आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यावेळी म्हणाले की, तीन-चार वर्षापूर्वी लोकशाहीची हत्या ठाण्यातूनच झाली हे लक्षात घेऊन संविधान वाचवण्यासाठी ही रॅली ठाण्यातून काढण्यात आली आहे. वोटचोरी होत आहे, गोकुळमधील सत्ताही भाजपाने चोरली. जनतेने निवडून दिल्यानंतर सरकार चालवताना ते संविधानानुसार चालवले पाहिजे पण भाजपा संविधानाला मानत नाही. आपण लढलो तर जिंकू शकतो हे लक्षात ठेवा. राज्यात शिव, शाहु, फुले व आंबेडकरांचा विचार जिवंत ठेवायचा असेल तर संविधान वाचवले पाहिजे.
ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, संविधानामध्ये साधू संतांचे विचार आहेत, समता बंधुतेचा विचार आहे आणि याच विचारावर भाजाचा सरकार घाला घालत असून संविधान व लोकशाही मोडीत काढण्याचे काम करत आहे. देशाला मोठ्या संघर्षानंतर स्वातंत्र्य मिळाले व त्यानंतर संविधान मिळाले. आज संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला आहे. वोटचोरी केली जात आहे, सरकार चोरले जात आहे, हे चित्र बदलले पाहिजे असे थोरात म्हणाले.
माजी मंत्री नसीम खान यावेळी म्हणाले की, देशाचे संविधान धोक्यात आले असून भाजपा सरकार मागील १३ वर्षापासून लोकशाही व संविधानाची पायमल्ली करत आहे. तर दुसरीकडे संविधान रक्षणाचे काम काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे व विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे करत आहेत. संविधानाने सर्व जाती, धर्म, भाषा व पंथाच्या लोकांना समान अधिकार दिला आहे, पण या हक्क व अधिकारावरच गदा आणली जात आहे.
या रॅलीत प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य माजी मंत्री बाळासाहेब थोरात, नसीम खान, खासदार चंद्रकांत हंडोरे, खा. शोभा बच्छाव, खा. प्रणिती शिंदे, खा. रविंद्र चव्हाण, खा. शिवाजी काळगे, आमदार भाई जगताप, CWC सदस्य माजी खासदार कुमार केतकर, हुसेन दलवाई, माजी मंत्री आ. डॉ. विश्वजीत कदम, रमेश बागवे, प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सुनिता गावंडे, मुजफ्फर हुसेन, चरणसिंग सप्रा, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव मोहन जोशी, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील, प्रदेश सरचिटणीस ऍड. संदेश कोंडविलकर, काँग्रेसचे नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महात्मा ज्योतीबा फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन संविधान बचाव रॅलीची सुरुवात करण्यात आली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी उपस्थितांना संविधान बचावची शपथ दिली.
दरम्यान, काँग्रेसच्या संविधान बचाव रॅलीत हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांसह नागरीकांना हजेरी लावली होती.


