चेन्नईतील दांपत्याकडून इतिहासातील सर्वात मोठे दान : तब्बल 208 कोटी किंमत


वृत्तसंस्था/तिरुपती


दक्षिण भारतातील सर्वात मोठे श्रद्धास्थान मानले जाणाऱ्या तिरुपती बालाजीच्या चरणी चेन्नईतील एका दांपत्याने इतिहासातील सर्वात मोठे दान अर्पण केले आहे.   तिरुमला येथील बालाजी मंदिराला 121 किलो सोन्याचे दागिने दान स्वरुपात देण्यात आले असून त्याची किंमत अंदाजे 208 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. वर्धमान जैन आणि त्यांच्या पत्नी राधिका जैन यांनी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या उपस्थितीत हे दान अर्पण केले. या दागिन्यांची सगळीकडे चर्चा होत आहे.


आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या उपस्थितीत गुरुवारी तिरुमला तिरुपती देवस्थानमकडे (टीटीडी) हे दागिने औपचारिकरीत्या सुपूर्द केले आहेत. या महादानामध्ये नऊ संचांमध्ये विभागलेले तब्बल 45 सोन्याचे दागिने आहेत. मुख्य मूर्ती तसेच उत्सवमूर्तींच्या अलंकारासाठी हे दागिने तयार करून घेण्यात आले आहेत. यामध्ये श्रीवारींचा मुकुट (किरीटम), कमरपट्टा (व•णम), खांद्यावरील दागिने (भुजकीर्ती), शंख-चक्र, अभय हस्त आणि पदम पादलू (पायातील विशिष्ट प्रकारची साखळी) यांसारख्या पारंपरिक अलंकारांचा समावेश आहे. शास्त्रातील नियम आणि देवस्थानच्या धार्मिक पद्धतींनुसार हे दागिने तयार करण्यात आले आहेत.


कडेकोट बंदोबस्तात मंदिरात आणले दागिने


चेन्नईतील जीआरटी ज्वेलर्स यांनी हे खास दागिने तयार केले आहेत. कडेकोट सुरक्षेत ते तिरुमला इथे आणण्यात आले असून रंगनायकुला मंडपम येथे लाकडी रॅकवर भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्याची व्यवस्था देवस्थान प्रशासनाने केली होती. भारताच्या इतिहासात कोणत्याही मंदिरासाठी एखाद्या व्यक्तीने दिलेले हे सर्वांत मोठे दान मानले जात आहे. सुमारे 2.26 लाख कोटी रुपयांची मालमत्ता असलेल्या तिरुमला देवस्थानच्या वैभवात या भक्तीभावाने आणखी मोठी भर पडली आहे.


अखेर दात्याची ओळख उघड


तिरुपतीच्या श्री व्यंकटेश्वर स्वामींच्या चरणी तब्बल 121 किलो सोन्याचे दागिने अर्पण करणाऱ्या अज्ञात भक्ताचे नाव समोर आले आहे. अॅक्सेस हेल्थकेअर आणि आशिया चेन्नई इंजिनिअरिंगचे संस्थापक वर्धमान जैन यांनीच हे महादान केल्याचे सांगण्यात आले आहे. देवस्थानकडे दागिने सुपूर्द करताना आपले नाव गुप्त ठेवण्याची विनंती त्यांनी केली होती, मात्र आता या दात्याची ओळख उघड झाली आहे.


पूर्वीपासूनच बालाजीचरणी सेवाभाव


वर्धमान जैन यांनी तिरुमला तिरुपती देवस्थानमला यापूर्वीही अनेकदा मोठी मदत केली आहे. वर्धमान जैन हे एक यशस्वी उद्योजक असून त्यांचा व्यवसाय आणि समाजकार्याचा मोठा आवाका आहे. 2025 मध्ये त्यांनी आपल्या ‘अॅक्सेस  हेल्थकेअर’ कंपनीतील 70 टक्के हिस्सा एका अमेरिकन कंपनीला विकला होता. हा व्यवहार सुमारे 2 अब्ज डॉलर्सचा असल्याचे सांगितले जाते. मे 2026 मध्ये त्यांनी देवस्थानला इलेक्ट्रिक बसेस भेट दिल्या होत्या. तसेच ‘श्री व्यंकटेश्वर भक्ती चॅनेल’च्या विकासासाठी 7 कोटी रुपयांची देणगी आणि देवस्थानच्या हुंडीतील नाणी मोजण्यासाठी 1 कोटी रुपये किमतीचे आधुनिक ‘कॉइन-सॉर्टिंग मशिन’ही पुरविले आहे.






Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.