37.85 कोटी टन उत्पादनाची नोंद : कमी पर्जन्यमानातही मोठा दिलासा
भारताची झेप…
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारताने 2025-26 या वर्षात 37 कोटी 85 लाख टन अन्नधान्य उत्पादनाची नोंद केली असून, हा विक्रमी टप्पा असल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली. भात उत्पादनात भारताने सलग दुसऱ्या वर्षी जगातील सर्वाधिक उत्पादक देशाचा मान कायम राखला आहे. तसेच गहू उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे. दरम्यान, 2026-27 च्या खरीप हंगामात प्रतिकूल हवामान आणि दुष्काळी परिस्थितीचे आव्हान असतानाही महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये गेल्या पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा अधिक उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
भारतातील अन्नधान्य उत्पादन नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. कृषी मंत्रालयाच्या अंतिम अंदाजानुसार, 2025-26 च्या पीक वर्षात देशाचे एकूण अन्नधान्य उत्पादन 37 कोटी 85 लाख टनांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. हे गेल्यावर्षीपेक्षा 2.081 कोटी टनांनी अधिक आहे. तांदूळ, गहू, मका आणि कडधान्यांच्या वाढलेल्या उत्पादनामुळे हा नवीन विक्रम साधला गेला आहे. हवामानाशी संबंधित आव्हाने असूनही 2026-27 च्या खरीप हंगामातही अन्नधान्य उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गुरुवारी नवी दिल्लीत ही पीक उत्पादनाची आकडेवारी जाहीर केली.
तांदूळ, गव्हाच्या उत्पादनात आघाडी
कृषी मंत्रालयाच्या अंतिम अंदाजानुसार, 2024-25 मधील 15.018 कोटी टनांच्या तुलनेत 2025-26 मध्ये तांदळाचे उत्पादन विक्रमी 15.515 कोटी टनांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. यामुळे तांदळाच्या उत्पादनात 49.7 लाख टनांची वाढ झाली आहे. गव्हाचे उत्पादन 41.2 लाख टनांनी वाढून 12.20 कोटी टन झाले. गेल्यावर्षी गव्हाचे उत्पादन 11.79 कोटी टन होते. मक्याच्या उत्पादनातही लक्षणीय वाढ झाली असून ते 4.34 कोटी टनांवरून 5.50 कोटी टनांवर पोहोचले आहे. दरम्यान, कडधान्यांचे एकूण उत्पादन 15.6 लाख टनांनी वाढून 2.72 कोटी टनांवर पोहोचले आहे.
मुगाचे उत्पादनही अव्वल
कडधान्यांमध्ये, मुगाच्या उत्पादनाने 44 लाख टनांचा विक्रमी आकडा गाठला आहे. हरभऱ्याचे उत्पादन 1.25 कोटी टन आणि तुरीचे उत्पादन 36 लाख टन राहण्याचा अंदाज आहे. भरड धान्य आणि पौष्टिक तृणधान्यांचे एकूण उत्पादन 7.40 कोटी टन असून बाजरीचे उत्पादन 1.72 कोटी टनांवर पोहोचले.
तेलबिया उत्पादनही विक्रमी पातळीवर
देशातील तेलबियांचे उत्पादनही 2024-25 मधील 4.299 कोटी टनांच्या तुलनेत विक्रमी 4.326 कोटी टनांपर्यंत वाढले आहे. शेंगदाण्याचे उत्पादन 1.23 दशलक्ष टनांनी वाढून 1.31 कोटी टन झाले. मोहरी आणि राईचे उत्पादन 1.10 दशलक्ष टनांनी वाढून 1.37 कोटी टन झाले. सोयाबीनचे उत्पादन 12.64 दशलक्ष टन राहण्याचा अंदाज आहे. व्यावसायिक पिकांमध्ये, उसाचे उत्पादन 50.37 कोटी टन आणि कापसाचे उत्पादन प्रत्येकी 170 किलो वजनाच्या 2.80 कोटी गाठी राहण्याचा अंदाज आहे.
हवामानातील विषमतेतही उत्पादनात वाढ अपेक्षित
कृषी मंत्रालयाच्या पहिल्या आगाऊ अंदाजानुसार, 2026-27 पीक वर्षाच्या खरीप हंगामात अन्नधान्याचे उत्पादन 16.71 कोटी टन राहण्याचा अंदाज आहे. हे गेल्या पाच वर्षांच्या सरासरी उत्पादनापेक्षा 97.7 लाख टनांनी अधिक असल्याचे कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले. यावर्षीच्या आव्हानांमध्ये एल निनोचे पुनरागमन, मान्सूनला झालेला विलंब आणि अनेक राज्यांमध्ये कमी पाऊस असे विषम व प्रतिकुल वातावरण होते. जूनमध्ये मान्सून उशिरा दाखल झाला . तसेच पाऊस सरासरीपेक्षा 35-40 टक्क्यांनी कमी झाला. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील अनेक भागांमध्ये जमिनीतील ओलाव्याचा अभाव आणि दुष्काळासारखी परिस्थिती राहिली. याचा परिणाम भात, मका, तूर, सोयाबीन आणि कापूस यांसारख्या पिकांच्या पेरणीवर झाला. तथापि, शेतकऱ्यांची मेहनत, सरकारी योजना आणि कृषी शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या हवामान-अनुकूल वाणांमुळे उत्पादन टिकवून ठेवण्यास मदत झाल्याचे दिसून येत आहे.
खरीप हंगामातील अंदाजित उत्पन्न
पहिल्या आगाऊ अंदाजानुसार, खरीप हंगामात भाताचे उत्पादन 12.19 कोटी टन होण्याचा अंदाज आहे. भरड धान्य आणि पौष्टिक धान्यांचे उत्पादन 3.81 कोटी टन अपेक्षित आहे. भरड धान्यांमध्ये मक्याचे उत्पादन 2.60 कोटी टन, बाजरीचे 8.94 दशलक्ष टन, ज्वारीचे 1.48 दशलक्ष टन, नाचणीचे 1.25 दशलक्ष टन आणि लहान भरड धान्यांचे 0.37 दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे. खरीप हंगामातील एकूण कडधान्यांचे उत्पादन 7.13 दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे.
डाळी, खाद्यतेल उत्पादन वाढवण्यावर सरकारचा भर
देशात तांदूळ आणि गव्हाचे पुरेसे उत्पादन होत असल्याने सरकार आता पीक विविधीकरण आणि डाळी व खाद्यतेलामध्ये स्वयंपूर्णता मिळवण्यावर लक्ष केंद्रित करत असल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले. डाळी आणि खाद्यतेल यांची मागणी सातत्याने वाढत असल्याने या गरजेचा एक मोठा भाग आयातीद्वारे पूर्ण केला जातो. यावर उपाय म्हणून सरकार राष्ट्रीय डाळ अभियान आणि राष्ट्रीय खाद्यतेल अभियान राबवत आहे. या योजनांचा उद्देश डाळी आणि तेलबियांच्या लागवडीखालील क्षेत्र वाढवणे आणि प्रतिहेक्टर उत्पादन सुधारणे हा आहे. भारताच्या तांदळाच्या निर्यातीत 5 टक्क्यांनी वाढ झाली असून बासमती तांदळाला अमेरिका, कॅनडा आणि मध्य पूर्वेतील बाजारपेठांमध्येही लक्षणीय प्रवेश मिळत असल्याचेही कृषिमंत्र्यांनी निदर्शनास आणून दिले.
डिजिटल सर्वेक्षणावरून अंदाज जाहीर
खरीप 2026-27 उत्पादनाचे पहिले आगाऊ अंदाज हे प्राथमिक आकडे आहेत. पीक कापणी प्रयोगांमधून प्रत्यक्ष उत्पन्नाची आकडेवारी उपलब्ध झाल्यावर पुढील अंदाजांमध्ये या अंदाजात बदल होऊ शकतो. हे अंदाज राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून मिळालेली माहिती, रिमोट सेन्सिंग, साप्ताहिक पीक हवामान निरीक्षण गटाचे अहवाल, डिजिटल पीक सर्वेक्षण आणि डिजिटल सामान्य पीक अंदाज सर्वेक्षण यावर आधारित असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले. यासोबतच, उद्योग क्षेत्राच्या प्रतिनिधींशी केलेल्या चर्चेअंती तीन स्तरांवर माहितीची तपासणी करण्यात आली.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.