नेटफ्लिक्सला केंद्र सरकारकडून महत्त्वाचा आदेश
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
पाकिस्तानमध्ये निर्माण होणाऱ्या मालिका आणि किंवा अन्य आशय यांचे प्रक्षेपण भारतात केले जाऊ नये, असा स्पष्ट आदेश केंद्र सरकारने ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मला दिला आहे. पाकिस्तानात निर्माण झालेली वादग्रस्त वेब मालिका ‘बचे है संग समेट लो’ च्या पार्श्वभूमीवर हा आदेश देण्यात आला आहे. या वेब मालिकेत फवाद खान आणि माहिरा खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी कोणते आशय भारतात प्रदर्शित करावेत आणि कोणते करु नयेत, या संदर्भात एक आदेश केंद्र सरकारने 8 मे 2025 या दिवशी लागू केला आहे. या आदेशाचे तंतोतंत पालन केले जावे, असा आदेश केंद्र सरकारने पुन्हा लागू केला आहे. हा आदेश पाळण्यास त्यावेळी सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी मान्यता दिली होती. तथापि, आदेशाचे पालन करण्यात ढिलाई दाखविण्यात येत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने त्यांना परिणामांची जाणीव करुन देणारा संदेश दिला.
मालिकेसंबंधी बरेच आक्षेप
‘बचे है संग समेट लो’ या मालिकेचा ट्रेलर नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानंतर या मालिकेच्या विरोधात अनेक आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. सर्वसामान्यांकडूनही अनेक तक्रारी आल्या आहेत. ही मालिका समाजहितासाठी उपयुक्त नाही, असा सर्वसाधारण आक्षेप आहे. या मालिकेचे प्रक्षेपण 4 डिसेंबर 2026 या दिवसापासून होणार आहे, अशी घोषणा करण्यात आली आहे. पाकिस्तानात निर्माण झालेली कोणतीही वेब मालिका किंवा चित्रपट भारतीय सबस्क्राईबर्ससाठी उपलब्ध करुन देण्यात आलेला नाही. या मालिकेसंबंधीही हेच धोरण आहे, असे स्पष्टीकरण नेटफ्लिक्सकडून केंद्र सरकारला देण्यात आले आहे.
दोन संघटनांची मागणी
या तसेच अन्य पाकिस्तानी मालिकांवर आक्षेप नेंदविण्यात चित्रपट क्षेत्राशी संबंधित दोन संघटनांनी पुढाकार घेतला आहे. अखिल भारतीय चित्रपट कर्मचारी संघटना (एआयसीडब्ल्यूए) आणि पश्चिम भारतीय चित्रपट कर्मचारी महासंघ (एफडब्ल्यूआयसीई) ही या संघटनांची नावे आहेत. या संघटनेच्या अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाकिस्तानी मालिकांवर बंदी घालण्याचा आग्रह धरलेला आहे. तशा मागणीचे निवेदन या संघटनांनी त्यांना नुकतेच दिले आहे.
इतरही प्लॅटफॉर्म्सविरोधात संताप
पाकिस्तानी मालिकांविरोधात भारतीयांचा संताप केवळ नेटफ्लिक्सपुरता मर्यादित नाही. अन्य सर्व खासगी प्लॅटफॉर्म्सनाही विरोध वाढत आहे. पाकिस्तानी नाटक दर ए निज्जत चे प्रदर्शन बेंगळूरमध्ये रोखण्यात आले आहे. ते 28 नोव्हेंबर आणि 5 डिसेंबरला होणार होते. अन्य पाकिस्तानी आशयावरही आक्षेप घेतले गेले आहेत.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.