जास्त मेद-साखर असणाऱ्या पदार्थांवर चिन्ह येणार
काय म्हणते सर्वोच्च न्यायालय…
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
अधिक प्रमाणात मेद (तेल किंवा तूप) आणि साखर असणाऱ्या पॅकेज्ड खाद्यपदार्थांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा आदेश दिला आहे. अशा पदार्थांच्या पॅकेजवर लाल रंगाचा ‘षट्कोन‘ चिन्हीत करावा, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. हा आदेश न्या. जे. बी. पारदीवाला आणि न्या. विनोद चंद्रन यांनी गुरुवारी दिला. हा आदेश एफआयएसएसएआयला दिला गेला. अन्नसुरक्षा आणि गुणवत्ता प्राधिकरणाला (एफआयएसएसएआय) सर्वोच्च न्यायालयाने आणखीही आदेश दिले आहेत. त्यांच्यानुसार प्रत्येक अन्न पॅकेजवर केवळ ‘अॅडेड शुगर्स’ आणि ‘अॅडेड फॅटस्’ अशी माहिती न मुद्रित करता, त्यांच्यासह ‘टोटल शुगर्स’ आणि ‘टोटल फॅटस्’ ही माहितीही मुद्रित करावी. तसेच या पदार्थामध्ये मीठाचे प्रमाण किती, हे देखील दर्शवावे, असा हा आदेश आहे.
दोन याचिकांवर निर्णय
या संबंधांमधील दोन याचिका थ्री एस अँड अवर हेल्थ या केरळमधील विनानफा संस्थेने सादर केल्या होत्या. त्यांच्यावर सुनावणी पूर्ण झाली होती. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने यासंबंधीचे सविस्तर निर्णयपत्र दिले आहे. प्राधिकरणाने सध्या अस्तित्वात असणाऱ्या मानकांचा पुनर्विचार करावा आणि ज्या पोषक द्रव्यांसंबंधी चिंता आहे. त्यांचे नेमके प्रमाण कोणत्या पदार्थांमध्ये किती असावे, याची नवी मानके संशोधन आणि माहितीच्या आधारे बनवावीत. तशी सूचना अन्नपदार्थांच्या पॅकेजिसवर असावी. ही मानके अगदी कमी किंवा अगदी अधिकही असू नयेत, असेही सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले.
तीन पोषक द्रव्यांसाठी तीन चिन्हे
मेद, साखर आणि मीठ या तीन पोषक द्रव्यांसंबंधी सर्वाधिक चिंता आहे. खाद्य पदार्थांमध्ये या तीन्ही पोषक द्रव्यांचे प्रमाण अधिक असेल, तर त्यांच्यासाठी तीन भिन्न भिन्न षट्कोनी चिन्हे उपयोगात आणावीत. प्रत्येक चिन्हाखाली शब्दांमध्ये ‘हाय फॅट’, ‘हाय शुगर’ आणि ‘हाय सॉल्ट’ असे, त्या त्या चिन्हानुसार मुद्रित केलेले असावे. पॅकेजच्या आकाराच्या 4 ते 5 टक्के इतक्या प्रमाणात ही चिन्हे असावीत. ती ग्राहकाला स्पष्टपणे दिसावीत याची दक्षता घेण्यात यावी. प्रत्येक षट्कोनाच्या खाली सुवाच्य अक्षरांमध्ये माहिती मुद्रित केलेली असावी. तसेच हे षट्कोन झाकले जातील किंवा दृष्टीत भरणार नाहीत, अशा प्रकारे कोणतेही अन्य मुद्रण या पॅकेजवर असू नये, असाही स्पष्ट आदेश देण्यात आलेला आहे.
सूची प्रसिद्ध करा
ज्या अन्नपदार्थांवर अशा प्रकारची माहिती किंवा चिन्हे मुद्रित करण्याची आवश्यकता नाही, अशा पदार्थांची स्पष्ट आणि सकारण सूची प्राधिकरणाने प्रसिद्ध करावी. या सूचीत असे कोणतेही नाव किंवा माहिती असू नये, की जेणेकरुन ग्राहकाचा गैरसमज होईल. कोणते अन्नपदार्थ षट्कोन चिन्हांकित आहेत आणि कोणते नाहीत, याची स्पष्ट कल्पना ग्राहकाला आली पाहिजे, याची दक्षता प्राधिकरणाने घ्यावी. ज्या पॅकेजेसवर लेबल लावलेले नाही, अशा पॅकेजेसवर प्राधिकरणाने 365 दिवस लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. जास्तीत जास्त पॅकेजिसवर पदार्थांचे इनग्रिडिएंटस् आणि पोषक द्रव्यांची नेमकी माहिती असावी. अनलेबल्ड पॅकेजिस कमीत कमी असावीत, अशी दक्षता घेण्यात यावी. तरच, ग्राहकांच्या प्रकृतीची सुरक्षा होईल, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
शाळेपासूनच अन्नसाक्षरता निर्माण करा
सर्वोच्च न्यायालयाने या संबंधात केंद्र सरकारलाही महत्वाचा आदेश दिला आहे. या आदेशानुसार केंद्र सरकारने शाळेच्या पातळीपासूनच विद्यार्थ्यांना पोषक द्रव्ये आणि त्यांचे प्रमाण किती असावे यासंबंधी ‘साक्षर’ बनवावे. शाळेच्या अभ्यासक्रमात या विषयांचा समावेश असावा, असाही आदेश निर्णयात देण्यात आला आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.