>> डॉ. मीनाक्षी पाटील [email protected]
आधुनिक चित्रकलेने अंतर्मन, स्वप्न, अवचेतन मन आणि भावनिक अनुभव या मानसिक अवकाशाला दृश्य स्वरूप दिले. याचा महत्त्वाचा परिणाम असा की, चित्रातील अवकाश बाह्य जगाचा आरसा राहिला नाही आणि काळ फक्त चित्रित क्षण राहिला नाही तर ते दोन्ही मानवी दृष्टी, स्मृती, भावना आणि अनुभवाशी जोडले गेले.
पोस्ट-इंप्रेशनिस्ट आणि इतर आधुनिक कलाकारांनी वस्तूच्या बाह्य रूपापेक्षा तिच्या रचनात्मक स्वरूपाचा कसा शोध घेतला व ‘अवकाश’ कसा बदलू लागला याविषयी आपण मागील लेखात पाहिले. क्यूबिझमने तर चित्रातील पारंपरिक ‘अवकाशाची’ संकल्पनाच मूलगामी पद्धतीने बदलली. पुनर्जागरण काळापासून चित्रकलेत प्रस्थापित असलेला एकमेव स्थिर दृष्टिबिंदू क्यूबिस्ट चित्रकारांनी नाकारला, वस्तूचे अनेक भाग, अनेक कोन आणि विविध दृश्यक्षण एकाच चित्रपृष्ठावर मांडण्याची पद्धत त्यांनी स्वीकारली. चित्रकाराला आता ‘वस्तू कशी दिसते?’ एवढाच प्रश्न त्याच्यासमोर नव्हता, तर ‘ती मला किती बाजूंनी दिसते?’, ‘माझी दृष्टी तिच्याभोवती कशी फिरते?’ आणि ‘अनुभवात काळाचा किती सहभाग आहे?’ हे प्रश्नही महत्त्वाचे ठरू लागले. कलाइतिहासीय विवेचनानुसार क्यूबिस्ट कलाकारांनी एका स्थिर दृष्टिकोनाऐवजी एका रचनेत अनेक दृष्टिकोनांचा समावेश केल्यामुळे पुनर्जागरण काळातील चित्रे आणि क्यूबिझम यांच्या दरम्यानचा संबंध केवळ शैलीगत विरोधाचा नाही तर तो अवकाश आणि दृष्टीच्या तत्त्वज्ञानातील परिवर्तनाचा ठरला. क्यूबिस्ट चित्रकारांनी विविध दृष्टिक्षणांना एकाच चित्रपृष्ठावर एकत्र आणले. येथे काळाचे अवकाशीकरण झाले. म्हणजेच वेगवेगळ्या क्षणांत प्राप्त झालेली दृश्य माहिती एका अवकाशात एकत्र केली गेली. त्यामुळे चित्रातील अवकाश हा आता ‘एक क्षण- एक दृश्य’ या तत्त्वावर आधारित राहिला नाही.
फ्युचरिझममध्ये ही प्रक्रिया आणखी पुढे गेली. उम्बर्तो बोच्चोनीसारख्या कलाकारांनी गती, एकाच वेळी घडणाऱया क्रिया आणि बहुआयामी अवकाश यांचा शोध घेतला. बोच्चोनीच्या कलाविचारात motion, simultaneity आणि spatial relationships यांचा परस्परसंबंध स्पष्ट केला आहे. अशा प्रकारे आधुनिक चित्रकला स्थिर प्रतिमेच्या मर्यादेला आतूनच आव्हान देऊ लागली. चित्रकार आता केवळ एक ‘क्षण न पकडता’ ते क्षणांची मालिका एका दृश्यरचनेत संकुचित करू लागले. याच प्रक्रियेत कलाकाराच्या व्यक्तिनिष्ठ दृष्टीला महत्त्व मिळाले. वस्तूचा बाह्य आकार महत्त्वाचा असला तरी कलाकाराचा अनुभव, प्रकाशाचे क्षणिक स्वरूप आणि दृष्टीची हालचाल अधिक महत्त्वाची ठरू लागली. यामुळे आधुनिक चित्रकलेतील अवकाश हा वस्तुनिष्ठ भौगोलिक अवकाश न राहता अनुभवलेला अवकाश बनू लागला. याच आधुनिकतेच्या प्रवाहात अभिव्यक्तिवाद, फॉव्हिझम, दादावाद, अतियथार्थवाद इत्यादी प्रवाहांनी बाह्य वास्तवापेक्षा अंतर्मन, स्वप्न, अवचेतन मन आणि भावनिक अनुभव यांना महत्त्व दिले, परिणामी अवकाश हा मानसिक अवकाश बनू लागला.
स्वप्नात वास्तवातील अंतर, प्रमाण आणि काळाचे नियम बदलतात. एकाच क्षणी भूतकाळातील घटना वर्तमानात येऊ शकते, लहान वस्तू प्रचंड मोठी होऊ शकते, अशक्य स्थळे एकत्र येऊ शकतात. आधुनिक चित्रकलेने या मानसिक अवकाशाला दृश्य स्वरूप दिले. म्हणून आधुनिकतेचा महत्त्वाचा परिणाम असा की, चित्रातील अवकाश बाह्य जगाचा आरसा राहिला नाही आणि काळ फक्त चित्रित क्षण राहिला नाही तर ते दोन्ही मानवी दृष्टी, स्मृती, भावना आणि अनुभवाशी जोडले गेले. पुढे अमूर्त कलेत हा प्रवास आणखी पुढे गेला-जिथे चित्रात कोणतेही ओळखण्याजोगे बाह्य स्थळ किंवा घटना नसतानाही अवकाश आणि काळाची तीव्र अनुभूती निर्माण होऊ लागली.
आधुनिक चित्रकलेने बाह्य वास्तवाच्या अनुकरणापासून स्वतची मुक्तता करून घेतल्यानंतर चित्रकलेसमोर एक नवा प्रश्न उभा राहिला-जर चित्रात एखादी वस्तू, व्यक्ती किंवा दृश्य दाखवणे आवश्यक नसेल, तर चित्रात अवकाश कसा निर्माण होईल? या प्रश्नाचे एक महत्त्वाचे उत्तर अमूर्त चित्रकलेने दिले. अमूर्त चित्रात ओळखण्याजोग्या वस्तू नसल्या तरी बिंदू, रेषा, रंग, आकार, पोत आणि त्यांच्या परस्परसंबंधातून एक दृश्य विश्व निर्माण होते. त्यामुळे अवकाश हा बाह्य जगाचा अवकाश न राहता चित्रभाषेने स्वत निर्माण केलेला अवकाश बनतो.
अमूर्त चित्रकलेत रेषा एखाद्या वस्तूची सीमा असू शकत नाही तर ती स्वतच एक स्वतंत्र दृश्य घटना असते. रंग एखाद्या फुलाचा किंवा आकाशाचा रंग नसतो तर तो स्वतची एक भावनिक आणि दृश्य शक्ती घेऊन येतो. आकार एखाद्या वस्तूचे प्रतिनिधित्व करण्याऐवजी चित्राच्या संतुलनात भूमिका बजावतो. या प्रक्रियेत चित्रातील ‘रिकामी जागा’देखील अत्यंत महत्त्वाची ठरते. पाश्चात्त्य चित्रपरंपरेत चित्रातील रिकामी जागा अनेकदा पार्श्वभूमी म्हणून पाहिली जात होती, परंतु अमूर्त चित्रकलेत मात्र ती स्वतच सक्रिय घटक बनते. चित्रातील रंगवलेल्या आणि न रंगवलेल्या भागांमधील अंतर, विरळ रेषा किंवा मोठे मोकळे क्षेत्र यांमधून विस्तार किंवा संकोच, स्थिरता किंवा गती, ताण किंवा शांतता, एकाकीपणा किंवा विस्ताराची भावना निर्माण होऊ शकते.
अमूर्त चित्रकलेतील काळाचा अनुभवही अधिक सूक्ष्म असतो. चित्रात कोणतीही घटना घडत नसली तरी चित्र पाहताना प्रेक्षकाची नजर एका आकाराकडून दुसऱयाकडे फिरते. ही दृश्य हालचाल एक प्रकारचा कालिक अनुभव निर्माण करते. तसेच चित्रकाराच्या हाताच्या हालचालीचा ठसा चित्रात राहतो. रंगाचे थर लावणे किंवा खरडणे, पुसणे, परत रंगवणे यासोबतच जलद, आक्रमक किंवा संथ ब्रशस्ट्रोकमधून निर्मितीची प्रक्रिया जाणवते. त्यामुळे चित्र म्हणजे केवळ अंतिम परिणाम नसून घडून गेलेल्या क्रियेची नोंददेखील असते. पाश्चिमात्य तसेच भारतीय चित्रपरंपरेतील या बदलत्या काल व अवकाशाविषयी पाहू या पुढील लेखांमध्ये!
(लेखिका साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव, कवयित्री, चित्रकार आहेत.)
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.