>> अशोक घाडीकर


‘ग्रँड थेफ्ट ऑटो 6’ अर्थात ‘जीटीए-6’ गेम प्रदर्शित होण्यापूर्वी प्रचंड लोकप्रिय आणि उत्सुकता वाढविणारा ठरला. या गेमने मिळवलेले जागतिक लक्ष आणि प्रदर्शनानंतर निर्माण झालेली चर्चा हे गेमिंग उद्योगाच्या वाढत्या सामर्थ्याचे महत्त्वाचे उदाहरण ठरले आहे.


व्हिडीओ गेमच्या जगात लोकप्रियता मिळवणारे अनेक खेळ आले आणि गेले. मात्र एखाद्या गेमच्या नव्या आवृत्तीची प्रतीक्षा तब्बल 13 वर्षे सुरू राहणे आणि त्या प्रतीक्षेची जागतिक स्तरावर चर्चा होणे, ही दुर्मीळ घटना ठरली. ‘ग्रँड थेफ्ट ऑटो 6’ अर्थात ‘जीटीए-6’ने हे करून दाखवले आहे. 19 नोव्हेंबर 2026 रोजी हा गेम जगभरात प्रदर्शित झाला आणि तब्बल 13 वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला. गेम प्रदर्शित होण्यापूर्वी सोशल मीडियावर त्याचे मीम्स, चर्चा आणि विविध अंदाजांचा पूर आला होता. गेमिंगशी संबंध नसलेल्या लोकांनाही त्याच्याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. या लोकप्रियतेमागे एका पिढीच्या आठवणी, ‘जीटीए-5’चे यश, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि रॉकस्टार गेम्सची दीर्घकालीन व्यावसायिक रणनीती आहे.


जीटीएच्या लोकप्रियतेचा पाया ‘व्हाईस सिटी’ने घातला. संगणकावर किंवा सायबर कॅफेमध्ये गेम खेळणाऱया तरुणांसाठी ‘व्हाईस सिटी’ हा एक वेगळाच अनुभव होता. टॉमी व्हर्सेटी आणि दियाज यांसारखी पात्रे, शहरातील रस्ते, वेगवेगळ्या गाडय़ा, हेलिकॉप्टरची मोहीम आणि मनाप्रमाणे फिरण्याचे स्वातंत्र्य यामुळे खेळाडू या आभासी जगाशी जोडले गेले. गेममध्ये गाडय़ा पळवणे, विविध ठिकाणे ताब्यात घेणे, मोहिमा पूर्ण करणे आणि चिट कोड वापरून वेगवेगळे प्रयोग करणे यातून मिळणारा आनंद वेगळा होता. यामुळे ‘व्हाईस सिटी’ची लोकप्रियता फक्त तिच्या तंत्रज्ञानापुरती मर्यादित राहिली नाही. एका पिढीच्या बालपणाचा तो महत्त्वाचा भाग बनला.


त्यानंतर ‘जीटीए सॅन अँड्रियास’, ‘जीटीए 4’ आणि ‘जीटीए 5’ या आवृत्त्या आल्या. प्रत्येक वेळी खेळातील दृश्ये, पात्रांच्या हालचाली, वाहनांची रचना आणि शहरांचा विस्तार अधिक विकसित झाला. मात्र या मालिकेला जागतिक बाजारपेठेत मोठे यश मिळवून देणारी आवृत्ती ठरली ती 2013 मध्ये प्रदर्शित झालेली ‘जीटीए 5’. त्या काळात ‘एसबॉस’ आणि ‘प्लेस्टेशन’ या खेळयंत्रांची लोकप्रियता वाढत होती. या पार्श्वभूमीवर ‘जीटीए 5’ने खेळाडूंना अधिक वास्तवदर्शी अनुभव दिला. विशेष म्हणजे या आवृत्तीत बहुखेळाडू ऑनलाइन खेळण्याची सुविधाही होती. त्यामुळे एकदा गेम पूर्ण केल्यानंतर तो बाजूला ठेवण्याची गरज राहिली नाही. खेळाडू पुनः पुन्हा ऑनलाइन येऊ लागले. गेममधील अतिरिक्त सुविधा आणि वस्तूंच्या खरेदीतून कंपनीला उत्पन्न मिळू लागले. ‘जीटीए 5’च्या कोटय़वधी प्रती विकल्या गेल्या आणि अनेक वर्षांनंतरही तिची विक्री सुरू राहिली.


तेरा वर्षांचा विलंब का झाला?


‘जीटीए-5’च्या यशानंतर पुढील आवृत्तीबद्दल अपेक्षा प्रचंड वाढल्या होत्या. मात्र ‘जीटीए-6’ तयार करणे हे कंपनीसमोर मोठे आव्हान होते. आधीच्या आवृत्तीने दिलेला अनुभव मागे टाकण्यासाठी केवळ नवीन पात्रे आणि शहर आणून भागणार नव्हते. गेममधील प्रत्येक गोष्ट अधिक तपशीलवार आणि वास्तवदर्शी बनवणे आवश्यक होते. त्यामुळे निर्मितीला वेळ लागला. 2022 पर्यंत गेमबाबत कोणतीही ठोस अधिकृत माहिती समोर आली नव्हती. त्यामुळे काही चाहत्यांनी या गेमची प्रतीक्षाच सोडून दिली होती. याच वर्षी ‘रॉकस्टार गेम्स’वर सायबर हल्ला झाला. या हल्ल्यात गेमचे अपूर्ण दृश्य चित्रण इंटरनेटवर प्रसिद्ध झाले. त्यातून ‘जीटीए 6’च्या निर्मितीची पहिली झलक लोकांना पाहायला मिळाली. दृश्यांमध्ये त्रुटी होत्या; परंतु कंपनी किती मोठय़ा प्रमाणावर काम करत आहे, याचा अंदाज त्यातून आला. त्यानंतर 5 डिसेंबर 2023 रोजी पहिली अधिकृत जाहिरात चित्रफीत प्रदर्शित झाली. अवघ्या 24 तासांत या चित्रफितीला प्रचंड प्रतिसाद मिळाला.


‘जीटीए-6’च्या निर्मितीमध्ये प्रत्येक छोटय़ा गोष्टीचा विचार करण्यात आल्याचे दिसून आले. पात्रांचे चेहरे, हालचाली, वाहनांची रचना आणि परिसरातील वातावरण यांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. या गेमचे कथानक अमेरिकेतील काल्पनिक लिओनिडा प्रांतात घडते. त्यातील ‘व्हाईस सिटी’ हे शहर या मालिकेच्या जुन्या चाहत्यांसाठी विशेष आकर्षण ठरले आहे. जेसन आणि लुसिया ही दोन प्रमुख पात्रे असून एका अयशस्वी गुन्हेगारी मोहिमेनंतर ते एका मोठय़ा गुन्हेगारी कटात अडकतात. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना एकमेकांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे गेममध्ये केवळ शहराचा फेरफटका किंवा मोहिमा पूर्ण करणे एवढाच अनुभव नसून कथानकाला महत्त्वाचे स्थान आहे.


या गेमच्या निर्मितीमागील खर्चही चर्चेचा विषय ठरला आहे. ‘जीटीए -6’ तयार करण्यासाठी सुमारे 1.5 अब्ज डॉलर खर्च झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र ‘रॉकस्टार गेम्स’ किंवा ‘टेक-टू इंटरअॅक्टिव्ह’ने अधिकृत खर्च जाहीर केलेला नाही. त्यामुळे हा आकडा निश्चित मानता येत नाही. या रकमेची तुलना जगातील मोठय़ा पायाभूत प्रकल्पांच्या खर्चाशी केली जात आहे.


‘व्हाईस सिटी’ खेळण्यासाठी सायबर कॅफेमध्ये जाणारी पिढी आता अत्याधुनिक खेळयंत्रांवर (गेम कॉन्सोल) ‘जीटीए-6’चा अनुभव घेत आहे. या प्रवासात तंत्रज्ञान बदलले, खेळाडूंच्या अपेक्षा बदलल्या आणि गेमिंग उद्योगाचे अर्थकारणही बदलले. ‘रॉकस्टार गेम्स’ने या बदलांचा अचूक अंदाज घेत एका गेमभोवती जागतिक स्तरावर उत्सुकता निर्माण केली. आता प्रत्यक्ष प्रदर्शनानंतर या उत्सुकतेचे रूपांतर किती मोठय़ा व्यावसायिक यशात होते हे आगामी विक्रीचे आकडे स्पष्ट करतील. मात्र गेम प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याने मिळवलेले जागतिक लक्ष आणि प्रदर्शनानंतर निर्माण झालेली चर्चा हे गेमिंग उद्योगाच्या वाढत्या सामर्थ्याचे महत्त्वाचे उदाहरण ठरले आहे.


(लेखक सायबर तज्ञ आहेत.)



Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.